ठाणे प्रतिनिधी -नागेश पवार
दिवा (६) : श्रीमंतयोगी प्रतिष्ठान, दिवा यांच्या वतीने ‘दशकपूर्ती सोहळ्या’चे औचित्य साधून यंदा ऐतिहासिक शिवजयंती उत्सव (तिथीनुसार) मोठ्या उत्साहात आणि थाटामाटात साजरा करण्यात येत आहे. शुक्रवार, ०६ मार्च २०२६ रोजी दातिवली तलाव, दिवा आगासन रोड, गणेश नगर, दिवा (पूर्व) येथे या ‘हिंदवी स्वराज्य महोत्सवा’चे भव्य आयोजन करण्यात आले आहे.
भरगच्च कार्यक्रमांची मेजवानी:
या महोत्सवानिमित्त दिवसभर विविध धार्मिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे:
सकाळी ०७:३० वा. – श्री शिवछत्रपती महाराजांच्या मूर्तीची भव्य मिरवणूक
सकाळी ०९:३० वा. – श्री शिवछत्रपती मूर्ती प्रतिष्ठापना
सकाळी ११:०० वा. – श्री सत्यनारायणाची महापूजा
दुपारी ०४:०० ते सायं. ०७:०० वा. – महिलांसाठी हळदीकुंकू समारंभ
सायंकाळी ०७:०० वा. – शिव भंडारा (महाप्रसाद)
रात्री ०८:०० वा. – सुस्वर भजन
कोकणातील पारंपारिक ‘नमना’चे विशेष आकर्षण:
उत्सवाची सांगता कोकणातील प्रसिद्ध लोककलेने होणार आहे. रात्री १०:३० वाजता सह्याद्रीच्या कानाकोपऱ्यात गाजलेले ‘श्री वरदान देवी नाट्य मंडळ’ (मु. मावळंगे – मांडरकरवाडी, ता. संगमेश्वर, जि. रत्नागिरी) यांचे पारंपारिक ‘नमन’ सादर होणार असून, हे या महोत्सवाचे प्रमुख आकर्षण ठरणार आहे.
या महोत्सवाच्या यशस्वीतेसाठी प्रतिष्ठानचे आधारस्तंभ श्री. शशिकांत सोमनाथ पाटील, कार्याध्यक्ष श्री. अरविंद अशोक उभारे, अध्यक्ष श्री. अजय चव्हाण, उपाध्यक्ष श्री. राहुल कानसकर यांच्यासह सर्व विश्वस्त कार्यकारिणी, पदाधिकारी, सभासद व महिला मंडळ, दिवा यांनी विशेष परिश्रम घेतले आहेत. या ऐतिहासिक शिवजन्मोत्सवास परिसरातील सर्व शिवभक्तांनी आणि नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन श्रीमंतयोगी प्रतिष्ठानतर्फे करण्यात आले आहे.
