अजित पवार अपघात प्रकरणात व्ही. के. सिंग यांच्यावर रोहित पवारांचे गंभीर आरोप…
२८ जानेवारी २०२६ रोजी महाराष्ट्राचे तत्कालीन उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा विमान अपघात झाला होता. त्या अपघातात त्यांचा मृत्यू झाला. त्यानंतर या अपघातामागे कुणाचे तरी मोठे षडयंत्र असल्याचा आरोप आमदार रोहित पवार यांनी केला होता.
यासाठी त्यांनी गेल्या काही दिवसांपासून पत्रकार परिषदाही घेतल्या आहेत. तसेच त्यांनी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली असून, तपासासाठी सीआयडीकडे काही कागदपत्रेही दिली आहेत.
यानंतर सीआयडीने व्हीएसआर कंपनीचे प्रमुख व्ही. के. सिंग यांना पुण्यात गुरुवारी (६ मार्च) चौकशीसाठी बोलावले होते. या चौकशीदरम्यान सिंग यांना सीआयडी पोलिसांनी व्हीआयपी ट्रिटमेंट दिल्याचा आरोप रोहित पवार यांनी केला आहे. तसेच त्यांना संध्याकाळी काही वेळ क्रिकेट सामना पाहण्याचीही मुभा देण्यात आली, असेही पवार म्हणाले आहेत.
सत्याचा सूर्य उगवल्याशिवाय राहणार नाही
या प्रकरणातील चौकशीबाबत रोहित पवार यांनी सोशल मीडियावर पोस्ट केली आहे. त्यात त्यांनी म्हटले आहे की, अजितदादांच्या दुर्दैवी मृत्यूस कारणीभूत ठरलेल्या अनेकांपैकी एक कारण असलेला व्हीएसआर कंपनीचा मालक व्ही. के. सिंग याला सीआयडीने चौकशीसाठी बोलावले होते की शाही पाहुणचारासाठी, याबाबत आता शंका निर्माण झाली आहे. सकाळी ११ वाजता आल्यानंतर त्याची आठ तास चौकशी केल्याचे सांगण्यात आले, पण प्रत्यक्षात बहुतांश वेळ त्याची बडदास्त ठेवण्यात आणि पाहुणचार करण्यातच गेला. रात्री तर काळ्या काचा लावलेल्या पोलिसांच्या गाडीतून पाहुण्याप्रमाणे त्याची पाठवणी करण्यात आली. यामागे नेमके काय सुरू आहे? काळे कारनामे करणाऱ्याला अशा काळ्या काचा असलेल्या गाडीतून का सोडण्यात आले? मात्र कितीही काळे पडदे टाकण्याचा प्रयत्न केला तरी या प्रकरणात सत्याचा सूर्य उगवल्याशिवाय राहणार नाही, असे त्यांनी म्हटले आहे.
सत्ताधारी आमदार जागे होतील का?
पुढे पवार म्हणाले, एकीकडे आमचा हक्क असूनही या अपघाताबाबत एफआयआरही नोंदवून घेतला जात नाही, पण दुसरीकडे ज्याच्या विमानामुळे अजितदादांना आपण गमावले त्या व्ही. के. सिंग यांना मात्र कुणाच्या आशीर्वादाने व्हीआयपी ट्रीटमेंट दिली जाते? याबाबत वार्तांकन करण्यासाठी गेलेल्या पत्रकारांनाही पोलिसांकडून अत्यंत चुकीची वागणूक दिली जाते. अशा परिस्थितीत तरी अजितदादांसोबत काम केलेले आणि त्यांचे ‘विश्वासू’ सत्ताधारी आमदार जागे होतील का, असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला.
व्ही. के. सिंग यांना वाचवण्याचा प्रयत्न सुरू
तसेच रोहित पवार पुढे म्हणाले, आम्ही संध्याकाळी चार वाजता सीआयडी कार्यालयात जाणार आहोत. या अपघातप्रकरणी एफआयआर दाखल करणार आहात की नाही, हे विचारणार आहोत. या प्रकरणाची चौकशी योग्य पद्धतीने होत नाही. सत्तेत असताना देखील अजितदादांना न्याय देता येत नाही, असेही पवार म्हणाले. व्ही. के. सिंग यांना वाचवण्याचा प्रयत्न सुरू आहे. त्यांच्या पाठीमागे कुणाचा तरी हात आहे. अनेकांचा पैसा त्यांच्या कंपनीत गुंतलेला असल्यामुळे त्यांना वाचवले जात आहे. त्या लोकांना अजितदादांना न्याय देता येत नाही, ही अत्यंत वाईट गोष्ट आहे. दादांच्या बाबतीत जे घडले ते इतर कुणाच्या बाबतीत घडू नये, यासाठी मी लढत आहे, असे रोहित पवार म्हणाले.
