मविआचा उमेदवार ठरला; महायुती आणखी एक उमेदवार रिंगणात उतरवणार?
महाराष्ट्रातील राज्यसभेच्या सातव्या जागेसाठी सुरू असलेल्या राजकीय रस्सीखेचेला अखेर पूर्णविराम मिळाला असून महाविकास आघाडीकडून ज्येष्ठ नेते शरद पवार यांचे नाव निश्चित करण्यात आले आहे.
काँग्रेस आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षांनी या जागेवरील आपला दावा मागे घेत पवारांच्या उमेदवारीला पाठिंबा जाहीर केला आहे. त्यामुळे आघाडीतील अंतर्गत मतभेदांना तात्पुरता तरी पूर्णविराम मिळाल्याचे चित्र आहे.
राज्यसभेच्या सातव्या जागेसाठी महाविकास आघाडीतील तिन्ही पक्षांमध्ये चुरस निर्माण झाली होती. आघाडीने एकत्रितपणे एकच उमेदवार दिल्यास विजयाची शक्यता बळकट राहणार असल्याचे गणित मांडले जात होते. मात्र या एकमेव जागेसाठी राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या तिन्ही पक्षांनी दावा केला होता. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते आदित्य ठाकरे यांनी या जागेवर आमचा हक्क असल्याचे स्पष्टपणे सांगितले होते.
दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेसकडून शरद पवार यांना राज्यसभेवर पाठवण्याची भूमिका ठाम करण्यात आली. यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे आणि वरिष्ठ नेते जयंत पाटील यांनी मातोश्रीवर जाऊन उद्धव ठाकरे यांची भेट घेतली. या बैठकीत सकारात्मक चर्चा झाल्यानंतर ठाकरे यांनी पवारांच्या उमेदवारीला पाठिंबा देण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर काँग्रेसच्या पक्षश्रेष्ठींनीही पवार यांच्या नावावर शिक्कामोर्तब करत महाराष्ट्रातील नेत्यांना तसा निरोप दिला. यानंतर काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार यांनी एकत्रित पत्रकार परिषद घेत या संदर्भात माहिती दिल
या निर्णयामुळे महाविकास आघाडी एकसंघ असल्याचा संदेश देण्याचा प्रयत्न करत आहे. आगामी राजकीय समीकरणांच्या पार्श्वभूमीवर ज्येष्ठ आणि अनुभवी नेतृत्व राज्यसभेत असणे आवश्यक असल्याची भावना आघाडीतील नेत्यांनी व्यक्त केली आहे. पवार यांच्या दीर्घ राजकीय अनुभवाचा फायदा आघाडीला होईल, असा विश्वासही व्यक्त केला जात आहे.
महायुती आणखी एक उमेदवार देणार?
सत्ताधारी महायुतीतही हालचाली वेगाने सुरू आहेत. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे दोन उमेदवार रिंगणात उतरवण्याबाबत आग्रही असल्याची माहिती आहे. महायुतीचे सहा उमेदवार निश्चितपणे विजयी होतील, असे गणित मांडले जात असतानाच अतिरिक्त उमेदवार देऊन लढत रंगवण्याची रणनीती आखली जात आहे. भारतीय जनता पक्षाची संमती मिळाल्यास शिंदे आपल्या पक्षाचा दुसरा उमेदवार जाहीर करु शकतात.
ही निवडणूक बिनविरोध होऊ नये, यासाठी आणखी एक उमेदवार देण्याची भूमिका मांडली गेली होती. आता शिवसेनेनेच पुढाकार घेत अतिरिक्त उमेदवार देण्याची तयारी दर्शवली आहे. या संदर्भातील अंतिम निर्णय लवकरच जाहीर होण्याची शक्यता आहे. त्यामुळे राज्यसभेची ही निवडणूक केवळ औपचारिक न राहता राजकीय प्रतिष्ठेची लढत ठरणार, असे संकेत मिळत आहेत.
महाराष्ट्रातील 7 जागा
भारतीय निवडणूक आयोगाने राज्यसभेच्या रिक्त होणाऱ्या 37 जागांसाठी द्विवार्षिक निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केला असून, यामध्ये महाराष्ट्रातील 7 जागांचा समावेश आहे. या रिक्त होणाऱ्या जागांसाठी येत्या 16 मार्च 2026 रोजी मतदान प्रक्रिया पार पडणार आहे. महाराष्ट्रासोबतच ओडिसा, तामिळनाडू, पश्चिम बंगाल, आसाम, बिहार, छत्तीसगड, हरियाणा, हिमाचल प्रदेश आणि तेलंगणा या राज्यांतील रिक्त होणाऱ्या जागासाठी ही निवडणूक होणार आहे.
महाराष्ट्रातील राज्यसभेचे सदस्य असलेले डॉ. भागवत किशनराव कराड, डॉ. फौजिया तहसीन अहमद खान, प्रियंका विक्रम चतुर्वेदी, शरदचंद्र गोविंदराव पवार, धैर्यशील मोहन पाटील, रजनी अशोकराव पाटील आणि रामदास आठवले या सात सदस्यांचा कार्यकाळ 2 एप्रिल रोजी संपणार आहे.
निवडणुकीचा कार्यक्रम
उमेदवारी अर्ज भरण्याची शेवटची तारीख 5 मार्च 2026 असेल. अर्जांची छाननी 6 मार्च रोजी केली जाणार असून 9 मार्चपर्यंत उमेदवारांना आपले अर्ज मागे घेता येतील. मतदान 16 मार्च रोजी सकाळी 9 ते दुपारी 4 या वेळेत होईल आणि त्याच दिवशी संध्याकाळी 5 वाजता मतमोजणी करून निकाल जाहीर केला जाईल.
मतदानासाठी निवडणूक अधिकाऱ्यांनी दिलेल्या विशेष जांभळ्या स्केच पेनचाच वापर करणे बंधनकारक असेल असे आयोगाने स्पष्ट केले आहे. संपूर्ण निवडणूक प्रक्रिया 20 मार्च 2026 पर्यंत पूर्ण करण्याचे निर्देश आयोगाने दिले आहेत.
