माळशिरस प्रतिनिधी – राजेंद्र पीसे
पाचगणी : शैक्षणिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या पाचगणी येथील शालोम इंटरनॅशनल स्कूलचे संचालक अजित बिरामने व श्वेता अजित बिरामने यांना सातारा मीडिया सेवन तर्फे देण्यात येणारा ‘सातारा प्राईड २०२६’ हा मानाचा पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे.
पाचगणी येथील शालोम इंटरनॅशनल स्कूलची स्थापना ज्येष्ठ समाजसेवक साहेबराव बिरामने यांनी केली होती. शिक्षणाच्या माध्यमातून समाजसेवा करण्याची त्यांची दूरदृष्टी आणि मूल्ये आजही संस्थेच्या कार्यातून दिसून येतात.
सध्या या शैक्षणिक वारशाला अजित बिरामने व श्वेता बिरामने समर्थपणे पुढे नेत आहेत. विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास, गुणवत्तापूर्ण शिक्षण आणि विविध शैक्षणिक उपक्रमांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना घडविण्याचे कार्य संस्थेत सातत्याने सुरू आहे.
त्यांच्या या उल्लेखनीय कार्याची दखल घेत सातारा मीडिया सेवन तर्फे यंदाचा ‘सातारा प्राईड २०२६’ पुरस्कार जाहीर करण्यात आला असून, त्यांच्या या यशाबद्दल सर्व स्तरांतून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
