वैजापूर प्रतिनिधी / अरविंद पवार
महाराष्ट्र शासनाच्या महसूल व वन विभागाच्या वतीने आयोजित ‘छत्रपती शिवाजी महाराज महसूल समाधान शिबिर अभियान’ मंडळ खंडाळा, ता. वैजापूर येथे मोठ्या उत्साहात पार पडले.
शासनाच्या विविध योजना व महसूल विभागाशी संबंधित सेवा थेट नागरिकांपर्यंत पोहोचविण्याच्या उद्देशाने आयोजित या शिबिराला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.
या शिबिरामध्ये प्रलंबित फेरफार प्रकरणे निकाली काढणे, अभिलेख दुरुस्ती, लोकसेवा हक्क कायद्यांतर्गत तात्काळ सेवा, डिजिटल सातबारा बाबत जनजागृती, सामाजिक अर्थसहाय्य योजनांतील पात्र लाभार्थ्यांना मंजुरी आदेशांचे वितरण तसेच पाणंद रस्त्यांबाबत प्रशासकीय मार्गदर्शन आदी विविध सेवा नागरिकांना उपलब्ध करून देण्यात आल्या. त्यामुळे अनेक नागरिकांची प्रलंबित कामे मार्गी लागली.
या कार्यक्रमास आमदार प्रा. रमेशजी बोरनारे सर तसेच उपविभागीय अधिकारी डॉ. अरुण जऱ्हाड ,तहसीलदार सुनील सावंत, नायब तहसीलदार सुरज कुमावत व नायब तहसीलदार महाजन साहेब व मंडळ अधिकारी खंडाळा काळे साहेब यांची प्रमुख उपस्थिती होती.
यावेळी उपस्थित मान्यवरांनी शासनाच्या योजना व सेवा थेट गावपातळीवर पोहोचविण्यासाठी अशा समाधान शिबिरांचे महत्त्व अधोरेखित केले. नागरिकांच्या समस्या तत्काळ सोडवून प्रशासनाने पारदर्शक व गतिमान सेवा देण्याचे आवाहनही त्यांनी केले.
यावेळी जिल्हा परिषद सदस्य संजय पाटील निकम, पंचायत समिती सदस्य हुसेन शहाबुद्दीन शेख तसेच महसूल विभाग, आरोग्य विभाग, महावितरणचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
परिसरातील ग्रामस्थांनी मोठ्या संख्येने उपस्थिती लावली. शिबिरामुळे नागरिकांच्या अनेक महसूल विषयक अडचणी दूर झाल्याने उपस्थितांनी समाधान व्यक्त केले.
