प्रतिनिधी : स्वाती हडकर
गुहागर : रेवस–रेडी सागरी महामार्गावरील जगबुड खाडी पुलाच्या कामासाठी तवसाळ गावात प्रशासनाने केलेल्या कारवाईदरम्यान वाद निर्माण झाला आहे.
पोलिसांच्या फौजफाट्यात जबरदस्तीने घर पाडल्याचा आरोप तवसाळ येथील तवसाळकर कुटुंबीयांनी केला असून या घटनेमुळे परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले.
मिळालेल्या माहितीनुसार, पुलाच्या बांधकामासाठी जागा मोकळी करण्याच्या उद्देशाने प्रशासनाकडून जेसीबीच्या सहाय्याने कारवाई करण्यात आली.
यावेळी पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.
मात्र या कारवाईदरम्यान तवसाळ येथील तवसाळकर कुटुंबाचे घर पाडण्यात आल्याचा आरोप करण्यात आला आहे.
तवसाळकर कुटुंबीयांनी या कारवाईस हरकत घेतली होती तसेच घर पाडण्यासाठी आपली कोणतीही मान्यता नसल्याचा दावा त्यांनी केला आहे.
तरीही प्रशासनाने अरेरावी करत जेसीबीच्या सहाय्याने घर पाडल्याचे कुटुंबीयांचे म्हणणे आहे.
घर पाडण्याच्या घटनेनंतर तवसाळकर कुटुंबीयांनी घटनास्थळी आक्रोश व्यक्त केला. पोलिसांच्या उपस्थितीत ही कारवाई झाल्याने ग्रामस्थांमध्येही नाराजी व्यक्त होत असल्याचे दिसून आले.


