दै. चालु वार्ता, पैठण प्रतिनिधी- तुषार नाटकर
छ. संभाजीनगर (पैठण): संत एकनाथ महाराज यांच्या नाथषष्ठी सोहळ्यानिमित्त नाथनगरी पैठण येथे राज्याच्या विविध भागांतून शेकडो दिंड्या दाखल होत असून शहरात सर्वत्र भक्तिमय वातावरण निर्माण झाले आहे. पैठण नगर परिषदेकडून शहरात येणाऱ्या दिंड्यांचे स्वागत करून भाविकांचे आदरातिथ्य करण्याचा उपक्रम राबविण्यात येत आहे.
याच अनुषंगाने शहरातील बसवेश्वर चौक येथे नगर परिषद प्रशासनाच्या वतीने दिंड्यांचे उत्साहात स्वागत करण्यात आले. मौजे तपवन येथून पायी मार्गक्रमण करत पैठणमध्ये दाखल झालेल्या श्री आगस्त ऋषी महाराज संस्थानच्या दिंडीचे विशेष स्वागत करण्यात आले. या वेळी दिंडीतील वारकरी व भाविकांना शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन सन्मानित करण्यात आले. या स्वागत सोहळ्यावेळी नगराध्यक्षा विद्या भुषण कावसानकर, मुख्याधिकारी पल्लवी अंभोरे, निता ठोके, उपमुख्य अधिकारी सोमनाथ गरजे, अश्विन गोजरे, धर्मराज उजागिरे, अशोक मगरे, पंकज पवार, विलास गावांडे, राजू पगारे, नवनाथ जगधने, सचिन ससाने, जितेंद्र तुपे, शाहीद शेख आदी नगरपरिषदेचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. नाथषष्ठी सोहळ्यानिमित्त पैठण नगरीत भाविकांची मोठ्या प्रमाणात गर्दी होत असून शहरात येणाऱ्या दिंड्यांचे स्वागत करण्याबरोबरच भाविकांना मूलभूत सुविधा उपलब्ध करून देण्याकडे नगर परिषद प्रशासनाचे लक्ष असल्याचे यावेळी सांगण्यात आले.
