दैनिक चालु वार्ता प्रतिनिधी/प्रेम सावंत
पालम: प्रतिबंधित गुटख्याची वाहतूक करणाऱ्या वाहनावर कारवाई करत पालम पोलीस ठाण्याच्या पथकाने सुमारे ३ लाख ३० हजार ६८० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला असून एका आरोपीला ताब्यात घेतले आहे.
पोलीसांना मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे दि. ७ मार्च रोजी सकाळी पालम–ताडकळस रस्त्यावरील जवळा शेतशिवार परिसरात सापळा लावण्यात आला. दरम्यान, संशयित टोयोटा कार (MH-04 GE 6954) थांबवून तपासणी केली असता कारमध्ये प्रतिबंधित विमल पानमसाला व तंबाखूचे पाऊच आढळून आले.
या कारवाईत सुमारे १ लाख ३० हजार ६८० रुपयांचा गुटखा तसेच अंदाजे २ लाख रुपयांची कार असा एकूण ३ लाख ३० हजार ६८० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. या प्रकरणी पोलीस हवालदार शंकर कोलमवाड यांच्या फिर्यादीवरून आरोपी अर्जुन वाघमारे याच्याविरुद्ध पालम पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
ही कारवाई पोलीस उपनिरीक्षक लोखंडे, पोलीस हवालदार शंकर कोलमवाड, पोलीस सिपाही भरतसिंग ठाकूर, सुदाम धुळगुंडे आदींच्या पथकाने केली.
