चंदगड (प्रतिनिधी):संदीप कांबळे
कौटुंबिक न्यायालय, कोल्हापूर यांच्या १३ व्या वर्धापन दिनानिमित्त समुपदेशनाच्या माध्यमातून कौटुंबिक वाद सामोपचाराने मिटवण्यासाठी केलेल्या उल्लेखनीय कार्याबद्दल तुडिये गावची कन्या ॲड. सुवर्णा शिवाजी कांबळे यांचा विशेष सन्मान करण्यात आला. मा. जिल्हा न्यायाधीश श्री. एस. एस. तांबे यांच्या हस्ते त्यांना सन्मानचिन्ह व गौरवपत्र प्रदान करून गौरविण्यात आले.
कौटुंबिक न्यायालयात येणाऱ्या अनेक प्रकरणांमध्ये पती-पत्नीतील मतभेद, कुटुंबातील तणाव आणि विविध प्रकारचे वाद समुपदेशनाच्या माध्यमातून सौहार्दपूर्ण पद्धतीने मिटविण्यासाठी ॲड. सुवर्णा कांबळे यांनी सातत्याने प्रभावी कार्य केले आहे. त्यांच्या संयमी, समजूतदार आणि सकारात्मक समुपदेशनामुळे अनेक कुटुंबांमध्ये पुन्हा संवाद प्रस्थापित होऊन कौटुंबिक सलोखा निर्माण होण्यास मदत झाली आहे. त्यांच्या या समाजोपयोगी कार्याची दखल घेत कौटुंबिक न्यायालयाच्या वर्धापन दिनानिमित्त त्यांचा सन्मान करण्यात आला.
या कार्यक्रमास न्यायव्यवस्था आणि विधी क्षेत्रातील अनेक मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाच्या व्यासपीठावर कोल्हापूर जिल्हा बार असोसिएशनचे अध्यक्ष श्री. व्ही. आर. पाटील, कौटुंबिक न्यायालयाच्या न्यायाधीश सौ. अपर्णा वाईकर, तसेच कौटुंबिक न्यायालय बार असोसिएशनचे अध्यक्ष श्री. आर. बी. पाटील उपस्थित होते.
कार्यक्रमादरम्यान कौटुंबिक न्यायालयाच्या कार्याचा आढावा घेण्यात आला तसेच समुपदेशनाचे महत्त्व अधोरेखित करण्यात आले. कौटुंबिक वाद न्यायालयाबाहेर सामोपचाराने मिटवण्यासाठी समुपदेशन ही प्रभावी आणि सकारात्मक पद्धत असल्याचे मान्यवरांनी यावेळी नमूद केले.
दरम्यान, ॲड. सुवर्णा कांबळे यांना मिळालेल्या या सन्मानाबद्दल वकील, सामाजिक क्षेत्रातील मान्यवर तसेच मित्रपरिवाराकडून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
