इराणच्या ड्रोनने बगदाद हादरलं; जयशंकर यांनी दिली 67 हजार भारतीयांची आनंदाची बातमी…
मध्यपूर्वेतील परिस्थिती आता हाताबाहेर जाताना दिसत आहे. एकीकडे इस्रायल आणि लेबनॉनमध्ये रक्ताचा सडा पडत असताना, दुसरीकडे इराण आणि अमेरिकेमधील संघर्ष एका नव्या वळणावर आला आहे.
जगातील सर्वात प्रगत मानली जाणारी अमेरिकेची ‘पॅट्रियट’ हवाई संरक्षण प्रणाली इराकच्या काही भागांत ड्रोन हल्ले रोखण्यात अपयशी ठरल्याचे वृत्त समोर आले आहे. या बिघडत्या परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर, भारताचे परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांनी मोठी माहिती दिली असून, आतापर्यंत ६७,००० भारतीय नागरिकांना युद्धभूमीतून सुखरूप बाहेर काढले आहे.
इराकच्या विमानतळावर ड्रोनचा पाऊस
इराकची राजधानी बगदाद आणि कुर्दिश प्रदेशातील एर्बिल आंतरराष्ट्रीय विमानतळावर भीषण ड्रोन हल्ले झाले आहेत. विशेष म्हणजे, या विमानतळावर अमेरिकन सैन्य तैनात आहे. स्थानिक माध्यमांच्या अहवालानुसार, काही ड्रोन पाडण्यात यश आले असले तरी, अमेरिकेच्या संरक्षण कवचाला खिंडार पाडण्याचे प्रयत्न इराण समर्थित गटांकडून सुरू आहेत. रात्रीच्या अंधारात झालेल्या या हल्ल्यांमुळे संपूर्ण परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे.
इस्रायलवर ‘पांढऱ्या फॉस्फरस’च्या वापराचे गंभीर आरोप
युद्धाच्या नियमांना हरताळ फासत इस्रायलने दक्षिण लेबनॉनमधील निवासी भागांवर ‘पांढऱ्या फॉस्फरस’चे गोळे डागल्याचा दावा ह्युमन राइट्स वॉच (HRW) ने केला आहे. ३ मार्च रोजी योमोर भागातील घरांवर हे ज्वलनशील गोळे पडल्याचे पुरावे समोर आले आहेत. पांढरा फॉस्फरस हा अत्यंत घातक असून, त्याच्या संपर्कात आल्यास मृत्यू किंवा आयुष्यभर न विसरणारे जखम होऊ शकते. आंतरराष्ट्रीय कायद्यानुसार लोकवस्तीत याचा वापर करणे हा मोठा गुन्हा मानला जातो.
इराणमध्ये मोज्तबा खामेनी यांचे युग सुरू
इराणच्या सत्तेत आता मोठा बदल झाला आहे. अयातुल्ला अली खामेनी यांच्यानंतर त्यांचे पुत्र मोज्तबा खामेनी यांची नवे सर्वोच्च नेते म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. इस्लामिक रिव्होल्युशनरी गार्ड कॉर्प्स (IRGC) ने तातडीने मोज्तबा यांच्याशी निष्ठा व्यक्त केली आहे. परराष्ट्र तज्ज्ञ रवींद्र सचदेवा यांच्या मते, मोज्तबा हे कट्टर विचारांचे असून ते अमेरिकेसमोर कधीही शरण जाणार नाहीत. यामुळे हे युद्ध अधिक प्रदीर्घ आणि हिंसक होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
भारत सरकारचे ‘ऑपरेशन सुरक्षा’
परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांनी स्पष्ट केले की, भारत सरकार आपल्या नागरिकांच्या सुरक्षेसाठी कटिबद्ध आहे. युद्धग्रस्त भागातून ६७,००० भारतीयांना परत आणणे हे एक मोठे आव्हान होते, जे यशस्वीरित्या पूर्ण केले जात आहे. अद्यापही काही भारतीय तिथे अडकले असून त्यांना बाहेर काढण्याचे प्रयत्न युद्धपातळीवर सुरू आहेत.
