अचानक झाडाझडतीत 41 लेट-लतिफ पकडले…
अहिल्यानगर महापालिकेच्या महापौर ज्योती गाडे यांनी महापालिकेच्या प्रशासकीय इमारतीच्या प्रवेशद्वारावर उभे राहून कर्मचाऱ्यांची उपस्थिती तपासली. या तपासणीदरम्यान सुमारे 150 कर्मचाऱ्यांपैकी 41 कर्मचारी नियोजित वेळेनंतर कामावर येताना आढळून आले.
यावेळी उशिरा येणाऱ्या कर्मचाऱ्यांना महापौरांनी चांगलेच सुनावले आणि पुढील काळात उशिरा येणाऱ्यांवर कडक कारवाई करण्याचा इशारा दिला.
अजित पवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि भाजपने (BJP)महापालिकेत सत्ता आहे. बहुमत मिळत, महापौर-उपमहापौरांनी कारभार सुरू केला आहे. महापौर ज्योती गाडे यांनी महापालिकेत सूत्रे हाती घेतल्यानंतर, अॅक्शन मोडवर आहेत. महापालिकेच्या कार्यालयांची झाडाझडती घेत आहेत. आता लेट-लतिफ त्यांच्या रडारवर आहेत. यातून त्यांनी गेट उभं राहत तपासणी केली.
महापौरपदाची (Mayor) सूत्रे हाती घेतल्यानंतर तातडीने प्रशासनाची बैठक घेऊन सर्व कर्मचाऱ्यांनी वेळेवर कामावर हजर राहावे, गळ्यात ओळखपत्र असावे, तसेच नागरिकांची कामे प्रामाणिकपणे पार पाडावीत, अशा सूचना देण्यात आल्या होत्या. मात्र अनेक कर्मचारी या सूचनांचे पालन करत नसल्याचे दिसून आले.
महापौरांनी स्वतःच तपासणी मोहीम हाती घेत सकाळी साडेनऊ वाजता महापालिकेच्या गेटवर उभे राहून त्यांनी येणाऱ्या कर्मचाऱ्यांची नोंद घेतली. यावेळी सुमारे 41 कर्मचारी उशिरा आल्याचे आढळून आले. नागरिकांची कामे वेळेवर होत नसल्यामुळे त्यांना वारंवार महापालिकेत हेलपाटे मारावे लागतात. त्यामुळे नागरिकांचा रोष पदाधिकाऱ्यांवर येतो.
कायदेशीर अन् दंडात्मक कारवाई
यापुढे कामचुकारपणा खपवून घेतला जाणार नाही, असे स्पष्ट करत जे कर्मचारी प्रामाणिकपणे काम करतील त्यांच्या पाठीशी आम्ही ठामपणे उभे राहू. मात्र कामात हलगर्जीपणा करणाऱ्यांना सोडले जाणार नाही. उशिरा येणाऱ्या कर्मचाऱ्यांवर कायदेशीर व दंडात्मक कारवाई केली जाईल आणि कोणाचीही गई केली जाणार नाही, असा इशाराही महापौर गाडे यांनी दिला.
मी जोपर्यंत पदावर आहे…
महापौर गाडे या महापालिकेच्या गेटवर उभ्या राहून कर्मचाऱ्यांची उपस्थिती तपासत होत्या. गेटवर उभे राहून साडेअकरा वाजेपर्यंत त्यांनी कर्मचाऱ्यांची हजेरी घेतली. यावेळी त्यांची शिस्त पाहायला मिळाली. नागरिकांच्या हितासाठी पदाचा उपयोग झाला पाहिजे. जोपर्यंत मी या पदावर आहे, तोपर्यंत नागरिकांना न्याय देण्याचे काम करीन, असे महापौर गाडे यांनी सांगितले.
