वैजापूर प्रतिनिधी/ अरविंद पवार
वैजापूर तालुक्यातील शिऊर बंगला येथे तुटलेल्या विजतारीमुळे लागलेल्या आगीत शेतकऱ्याचे मोठे नुकसान झाले. शिऊर बंगला येथील गट क्रमांक ६४४ मधील शेतकरी मच्छिंद्र जाधव यांच्या शेतातील उभा असलेला गहू दिनांक ७ मार्च २०२६ रोजी विजतार तुटून लागलेल्या आगीत जळून भस्म झाला.
या आगीत गंजी घातलेली सुमारे दीड एकर क्षेत्रातील तूर, शेततळ्यावरील ताडपत्री, स्प्रिंकलर संच, पाईप, जनावरांचा चारा तसेच कुट्टी आदी साहित्य जळून खाक झाले. या घटनेत शेतकऱ्याचे सुमारे चार लाख रुपयांपेक्षा अधिक नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात येत आहे.
सुदैवाने झाडाला बांधलेले बैल तसेच शेतात काम करणाऱ्या महिला थोडक्यात बचावल्याने मोठा अनर्थ टळला. घटनेची माहिती मिळताच सहाय्यक अभियंता निलेश ओहोळ, लाईनमन अमोल कुंटे व मनोज गवळी यांनी घटनास्थळी धाव घेऊन प्रत्यक्ष पाहणी केली व पुढील कार्यवाही सुरू केली.
तसेच ग्राम महसूल अधिकारी जितेंद्र कळस्कर यांनीही घटनास्थळी भेट देऊन झालेल्या नुकसानीचा पंचनामा केला. या घटनेमुळे परिसरातील शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून नुकसानग्रस्त शेतकऱ्यास तात्काळ मदत देण्याची मागणी नागरिकांकडून करण्यात येत आहे.
