प्रतिनिधी : स्वाती हडकर
चिपळूण : चिपळूण तालुक्यातील कळंबस्ते येथे उभारण्यात आलेल्या ‘देवराई – द बोटॅनिकल गार्डन’ या पर्यावरणपूरक प्रकल्पाचे तसेच या उपक्रमासाठी पुढाकार घेणाऱ्या प्रांताधिकारी आकाश लिगाडे व प्रशासनाचे पालकमंत्री डॉ. उदय सामंत यांनी विशेष कौतुक केले.
पर्यावरण संवर्धनासाठी अशा उपक्रमांची मोठी गरज असून लोकसहभागातून उभारलेली ही देवराई भविष्यात निसर्ग संवर्धनासाठी प्रेरणादायी ठरेल, असे मत त्यांनी व्यक्त केले.
प्रांताधिकारी कार्यालय व सह्याद्री निसर्ग मित्र संस्था यांच्या पुढाकारातून कळंबस्ते (रेल्वे फाटकाजवळ), ता. चिपळूण येथे उभारण्यात आलेल्या ‘देवराई – द बोटॅनिकल गार्डन’ या प्रकल्पाचा लोकार्पण सोहळा शनिवारी पालकमंत्री डॉ. उदय सामंत यांच्या हस्ते उत्साहात संपन्न झाला.
हा प्रकल्प आरजीपीपीएल आणि नेरोलॅक यांच्या प्रायोजकत्वातून साकारण्यात आला आहे.
लोकार्पणानंतर पालकमंत्री डॉ. उदय सामंत यांनी देवराई बोटॅनिकल गार्डनची पाहणी केली. यावेळी बोलताना त्यांनी सांगितले की, “कोकणातील नैसर्गिक संपदा आणि जैवविविधता जपणे ही काळाची गरज आहे. कळंबस्ते येथे उभारलेली ही देवराई केवळ वृक्षसंवर्धनाचा प्रकल्प नसून पर्यावरणाबाबत जनजागृती करणारे एक महत्त्वाचे केंद्र ठरेल.
विद्यार्थ्यांना आणि नागरिकांना निसर्गाचा अभ्यास करण्यासाठी ही देवराई उपयुक्त ठरेल.”
यानंतर आयोजित कार्यक्रमात प्रांताधिकारी आकाश लिगाडे यांनी मनोगत व्यक्त करताना या प्रकल्पाच्या उभारणीत झालेल्या लोकसहभागाचे कौतुक केले.
प्रशासन, सामाजिक संस्था आणि नागरिकांच्या सहकार्यामुळे हा उपक्रम यशस्वी झाला असून भविष्यात पर्यावरणाबाबत जनजागृती करण्यासाठी हा प्रकल्प महत्त्वाची भूमिका बजावेल, असे त्यांनी सांगितले.
या कार्यक्रमाला आमदार शेखर निकम, माजी आमदार रमेश कदम, माजी आमदार सदानंद चव्हाण, नगराध्यक्ष उमेश सकपाळ, सभापती सूर्यकांत खतले, माजी सभापती शौकत मुकादम, उपसभापती संदेश आयरे, पंचायत समिती सदस्य विनोद झगडे, स्नेहा साळवी, स्नेहा रहाटे, नितीन ठसाळे, जिल्हा परिषद सदस्य पूजा निकम, भाजप नेते प्रशांत यादव, विनोद भुरण, डॉ. निखिल चोरगे, मुख्याधिकारी संजय जाधव, नगरसेवक निहार कोवळे, कपिल शिर्के, अंकुश आवले आदी मान्यवर उपस्थित होते.
तसेच उपविभागीय कृषी अधिकारी शिवाजी शिंदे, सह्याद्री निसर्ग मित्र संस्थेचे संचालक भाऊ काटदरे, पोलीस निरीक्षक फुलचंद मेंगडे, माजी सभापती जितेंद्र चव्हाण यांच्यासह जिल्हा परिषद व पंचायत समिती सदस्य, नगरसेवक, विविध पक्षांचे पदाधिकारी आणि स्थानिक नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कळंबस्ते येथे उभारण्यात आलेले हे ‘देवराई – द बोटॅनिकल गार्डन’ स्थानिक जैवविविधतेचे जतन, पर्यावरण शिक्षण आणि निसर्ग पर्यटनाला चालना देणारे महत्त्वाचे केंद्र ठरणार असल्याचे यावेळी सांगण्यात आले.
