दैनिक चालु वार्ता मंठा प्रतिनिधी/सुरेश ज्ञा. दवणे जालना (मंठा )
महाराष्ट्रातील दिव्यांग बांधवांना स्वावलंबी बनवण्यासाठी राज्य सरकारने महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. स्वयंरोजगार सुरू करण्यासाठी दिव्यांग व्यक्तींना आता थेट १५ हजार रुपयांचे आर्थिक सहाय्य देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या निर्णयामुळे राज्यातील हजारो दिव्यांगांना स्वतःचा लहान व्यवसाय सुरू करण्याची संधी उपलब्ध होणार असून त्यांच्या आर्थिक सक्षमीकरणाला चालना मिळणार आहे.
दिव्यांग कल्याण मंत्री ना. अतुल सावे यांनी या नव्या उपक्रमाची माहिती देताना सांगितले की, दिव्यांग व्यक्तींना रोजगाराच्या संधी निर्माण करून देण्यासाठी सरकार कटिबद्ध आहे. अनेक दिव्यांग व्यक्तींमध्ये कौशल्य असूनही भांडवलाच्या अभावामुळे त्यांना व्यवसाय सुरू करता येत नाही. ही बाब लक्षात घेऊन सरकारने स्वयंरोजगारासाठी थेट आर्थिक मदत देण्याचा निर्णय घेतला आहे.
या योजनेअंतर्गत दिव्यांग लाभार्थ्यांना व्यवसायासाठी लागणारी साधनसामग्री, साहित्य किंवा छोटा उद्योग सुरू करण्यासाठी आवश्यक खर्च भागवण्यासाठी आर्थिक मदत दिली जाणार आहे. ही रक्कम थेट लाभार्थ्यांच्या बँक खात्यात जमा करण्यात येणार आहे.
दिव्यांग कल्याण आयुक्तालयाच्या माध्यमातून डीबीटी (Direct Benefit Transfer) पद्धतीने ही मदत वितरित केली जाणार असल्यामुळे संपूर्ण प्रक्रिया पारदर्शक राहणार असून कोणत्याही प्रकारचा मध्यस्थ टाळला जाणार आहे. त्यामुळे लाभार्थ्यांना थेट आर्थिक मदतीचा फायदा मिळणार आहे.
राज्य सरकारच्या या निर्णयाचे दिव्यांग बांधवांकडून स्वागत करण्यात येत असून या उपक्रमामुळे अनेकांना स्वतःचा व्यवसाय सुरू करून स्वाभिमानाने जीवन जगण्याची नवी संधी मिळणार आहे.
गरजू आणि पात्र दिव्यांग व्यक्तींनी संबंधित विभागाकडे अर्ज करून या योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहनही प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे.
