दैनिक चालू वार्ता प्रतिनिधी – स्वरूप गिरमकर
( पुणे ) वाघोली : उरळगाव ( ता. शिरूर ) परिसरात मोठ्या प्रमाणावर गहू, हरभरा, मका,यांची पेरणी झाली असून वीज वितरण कंपनीच्या भोंगळ कारभारामुळे बळीराजाला नाहक त्रास सहन करावा लागत आहे. रोज सकाळी एक ते दीड तास व दिवसभरात वारंवार वीज पुरवठा खंडीत होण्याचे प्रकार वाढले असून यामुळे व्यापाऱ्यांदेखील मनस्ताप सहन करावा लागत आहे.उन्हाळ्याची चाहूल लागत असतांनाच वीज वितरण कंपनीचा भोंगळ कारभार चव्हाट्यावर आला आहे.जवळच्या कार्यालयात ग्राहक संपर्क करीत असतांना तेथील भ्रमणध्वनी सातत्याने व्यस्त असतो. एखादवेळी कर्मचाऱ्याने फोन घेतलाच तर वरतून लाईट बंद आहे हे ठेवणीतले उत्तर दिले जात आहे. वरिष्ठांनी या गंभीर समस्येकडे लक्ष देवून सुरळीत वीज पुरवठा करावा अशी मागणी होत आहे.
एकीकडे उन्हाळ्याची चाहूल लागत असताना दुसरीकडे उरळगाव परिसरात भारनियमनाचे भूत पुन्हा डोके वर काढत आहे. रोज सकाळी ठरल्यासारखी एक ते दीड तास वीज गायब होणे, दिवसभरात वारंवार खंडित होणारा पुरवठा आणि तक्रार नोंदवण्यासाठी कार्यालयाशी संपर्क साधला असता मिळणारे टोलवाटोलवीचे उत्तर या सगळ्या प्रकारामुळे शेतकरी आणि व्यापारी वर्ग प्रचंड त्रस्त झाला आहे. शेतीच्या हंगामाच्या मध्यावर वीजेचा हा लपंडाव सुरू असल्याने बळीराजा हवालदिल झाला आहे. उरळगाव परिसरात यंदा मोठ्या प्रमाणावर गहू, हरभरा, मका या पिकांची पेरणी झाली आहे. हिवाळ्यातील पिके अंतिम टप्प्यात असताना आणि उन्हाळ्याच्या सुरुवातीला पाण्याची गरज वाढत असताना शेतकऱ्यांना नियमित वीज पुरवठा अत्यावश्यक असतो. विहिरी व बोअरवेलवर अवलंबून असलेल्या शेतकऱ्यांसाठी मोटार सुरू राहणे म्हणजेच पिकांचे प्राणवायू. मात्र रोज सकाळी अचानक वीज खंडित होत असल्याने पाण्याचे नियोजन कोलमडले आहे. काही शेतकऱ्यांनी सांगितले की, सकाळी ठराविक वेळेत पाणी देण्याची सवय असते; पण वीज नसल्याने वेळापत्रक पूर्णपणे बिघडते. त्यामुळे पिकांच्या वाढीवर परिणाम होत आहे.
*व्होल्टेजची तक्रार वाढली*
गहू व हरभरा पिके काढणीच्या उंबरठ्यावर असताना सिंचनाचे नियोजन अत्यंत महत्त्वाचे असते. पिकांना शेवटचे पाणी वेळेवर मिळाले नाही तर दाण्यांची भर पडत नाही. परिणामी उत्पादन घटते. दिवसभरात वारंवार वीज खंडित होत असल्याने मोटारी जळण्याचा धोका वाढला आहे. अनेक शेतकऱ्यांनी कमी व्होल्टेजचीही तक्रार केली आहे. मोटार सुरू केली की लगेच वीज जाते किंवा व्होल्टेज कमी असल्याने मोटार नीट चालत नाही, अशी स्थिती आहे.
*व्यापाऱ्यांनाही फटका*
व्यापारी वर्गही या समस्येमुळे त्रस्त झाला आहे.उरळगाव परिसरातील किराणा, थंड पेय, आईस्क्रीम, दुग्धजन्य पदार्थ व इतर शीतसाखळीवर अवलंबून असलेल्या दुकानांना वारंवार वीज खंडित होण्याचा फटका बसत आहे. फ्रीज व डीप फ्रीजर बंद पडल्याने माल खराब होण्याची शक्यता निर्माण होते. दिवसभरात तीन-चार वेळा वीज जाते.उन्हाळा सुरु झाल्याने घरगुती वापरकर्त्यांनाही अडचणींना सामोरे जावे लागत आहे. सकाळी वीज नसल्याने पिण्याचे पाणी भरणे, मुलांची शाळेची तयारी, घरातील दैनंदिन कामे यावर परिणाम होत आहे.
*चौकट -*
*कार्यालयातून प्रतिसाद नाही!*
या सर्व समस्यांमध्ये भर म्हणजे तक्रार नोंदवण्यासाठी वीज वितरण कंपनीच्या स्थानिक कार्यालयाशी संपर्क साधणेही कठीण झाले आहे. ग्राहकांनी सांगितले की, कार्यालयातील भ्रमणध्वनी सातत्याने व्यस्त असतो. अनेकदा फोन लावला तरी प्रतिसाद मिळत नाही. एखादवेळी कर्मचाऱ्याने फोन घेतलाच तर ‘लाईट बंद आहे’ किंवा ‘वरून लाईन बंद आहे’ असे ठरलेले उत्तर देऊन फोन ठेवला जातो. त्यामुळे नागरिकांमध्ये असंतोष वाढत आहे. स्थानिक पातळीवर वीजपुरवठा खंडित होण्यामागील नेमके कारण स्पष्ट केले जात नसल्याने संभ्रम वाढत आहे.
