दैनिक चालू वार्ता प्रतिनिधी – स्वरूप गिरमकर
( पुणे ) वाघोली : वाघोली ते बकोरी या मार्गावर पीएमपीएमएलची बससेवा रविवारी सुरु करण्यात आली. पहिल्या दिवशीच्या बस सेवेदरम्यान आमदार ज्ञानेश्वर कटके यांनी बसमध्ये प्रवास करून बकोरी ग्रामस्थांच्या उपस्थितीत चालक-वाहकांना गुलाबपुष्प व मिठाई देवून स्वागत केले. बकोरी भागात सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेचा अभाव असल्यामुळे नागरिकांना खासगी वाहनांवर अवलंबून राहावे लागत होते. वाघोली ते बकोरी या मार्गावर अनेक शैक्षणिक संस्था, रहिवासी सोसायट्या, गोडाऊन मोठ्या प्रमाणात आहेत. या परिसरातील विद्यार्थी, कामगार, रहिवासी आणि ग्रामस्थांना दररोज वाघोलीपर्यंत ये-जा करण्यासाठी हालअपेष्टा सहन कराव्या लागत होत्या. तसेच दैनंदिन प्रवास अधिक खर्चिक आणि त्रासदायक ठरत असल्याने वाघोली ते बकोरी या मार्गावर पीएमपीएमएलची बससेवा तातडीने सुरू करावी, अशी मागणी अखिल भारतीय माहिती सेवा समितीचे प्रदेशाध्यक्ष प्रल्हाद वारघडे यांच्या वतीने (दि. २६ नोव्हेंबर २०२५) पुणे पीएमपीएमएलचे वाहतूक व्यवस्थापक, आमदार कटके यांचेकडे निवेदनाद्वारे मागणी करण्यात आली होती. याबाबत आमदार कटके व वारघडे यांनी सातत्याने पाठपुरावा केल्याने अखेर पीएमपीएमएलकडून रविवारी (दि. १५ मार्च) वाघोली-बकोरी बससेवा सुरु झाली
पहिल्याच दिवशी नागरिकांनी बससेवेचे उत्साहात स्वागत केले. सकाळी पाच तर दुपारी चार अशा फेऱ्या असणार असल्याची माहिती वाहतूक अधिकारी सचिन राजपुरे यांनी दिली.
