ठाणे जिल्हा ग्रामीण प्रतिनिधी, विकी जाधव
कर्जत, : इबसार ग्रुप ऑफ कॉलेज कर्जत येथे दि.१० मार्च २०२६ रोजी झालेल्या नुक्कड नाटक (Nukkad Natak) स्पर्धेतील विजेत्यांचा लॉ बिल्डिंग ऑडिटोरियममध्ये पारितोषिक वितरण समारंभ आज रोजी मोठ्या उत्साहात पार पडला. या कार्यक्रमाचे आयोजन दुपारी १२.०० वाजता करण्यात आले होते.
या कार्यक्रमाचे आयोजन इबसार ग्रुप ऑफ कॉलेजेस, कर्जत यांच्या प्राचार्या डॉ. मोहिनी भट्टाचार्य यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले. कार्यक्रमासाठी सांस्कृतिक सचिव प्रा. अमित गडकरी व प्रा. विशाल धनवटे यांनी विशेष परिश्रम घेतले. तसेच कोर्स समन्वयक म्हणून प्रा. नम्रता मिसाळ, प्रा. श्रद्धा, प्रा. अफरोज आणि प्रा. स्वप्नाली धेंडे यांनी कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी मोलाचे सहकार्य केले.
या प्रसंगी अविनाश निगुडकर, संजय दिघे आणि दिनेश मते हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. उपस्थित मान्यवरांच्या हस्ते स्पर्धेतील विजेत्या विद्यार्थ्यांना पारितोषिक देऊन गौरविण्यात आले.
कार्यक्रमात प्राचार्या डॉ. मोहिनी भट्टाचार्य यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना मानसिक आरोग्य जागरूकता (Mental Health Awareness), भावनिक बुद्धिमत्ता (Emotional Intelligence), सामाजिक जाणीव, आत्मविश्वास वाढविणे आणि टीमवर्कचे महत्त्व या विषयांवर विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. अशा सांस्कृतिक उपक्रमांमुळे विद्यार्थ्यांचा व्यक्तिमत्व विकास घडून येतो, असे त्यांनी आपल्या भाषणात सांगितले.
नुक्कड नाटक स्पर्धेत सुरेश बनसोडे, अथर्व काटरे, पपीया मंडल, हृदय सांडणशिव, आशीष धमाले आणि रिया माने या विद्यार्थ्यांनी उत्कृष्ट सादरीकरण करून विजेतेपद मिळवले.
यामध्ये “Best Voice” हा विशेष पुरस्कार पपीया मंडल यांना देण्यात आला, तर “Second Best Voice” हा पुरस्कार शिरीन मन्सुरी यांना प्रदान करण्यात आला.
तसेच दुसऱ्या क्रमांकाचा नुक्कड नाटक पुरस्कार मिळवणाऱ्या संघामध्ये शिरीन मन्सुरी, राज भोईर, नमिता भोईर, नयन धुळे, प्रचिती डिसले आणि साई भोईर या विद्यार्थ्यांचा समावेश होता.
या कार्यक्रमाला विद्यार्थी व प्राध्यापक मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रम यशस्वीपणे पार पडल्याबद्दल आयोजकांचे सर्व स्तरातून कौतुक करण्यात आले.

