दैनिक चालु वार्ता मंठा प्रतिनिधी/सुरेश ज्ञा. दवणे जालना (मंठा )
तालुक्यातील वझर सरकटे येथे दि. १९ रोजी सायंकाळी सुमारे ४ वाजेच्या सुमारास वादळी वाऱ्यासह झालेल्या अवकाळी पावसाने आणि गारपीटीने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान केले आहे. काढणीच्या उंबरठ्यावर आलेली पिके काही क्षणातच उद्ध्वस्त झाल्याने शेतकरी हतबल झाला असून हातातोंडाशी आलेला घास हिरावला गेला आहे.
या अवकाळी पावसात गहू, ज्वारी, हरभरा, कांदा, हळद तसेच भोपळा व इतर भाजीपाला पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. अनेक शेतांमध्ये काढणीसाठी तयार असलेली पिके वादळी वाऱ्यामुळे जमिनीवर कोसळली, तर गारांच्या तडाख्याने पिकांचे दाणे गळून पडले आणि भाजीपाल्याचे पूर्णपणे नुकसान झाले.
शेतकऱ्यांनी मोठ्या कष्टाने जोपासलेली पिके अगदी शेवटच्या टप्प्यात असताना निसर्गाच्या या अचानक बदललेल्या रूपामुळे शेतकऱ्यांच्या आशा पाण्यात गेल्या आहेत. काही ठिकाणी काढणी केलेला मालही भिजल्याने त्याची गुणवत्ता घसरण्याची भीती व्यक्त होत आहे.
या अनपेक्षित संकटामुळे वझर सरकटे परिसरातील शेतकरी आर्थिक अडचणीत सापडला असून मोठ्या प्रमाणात नुकसान सहन करावे लागत आहे. आधीच वाढत्या उत्पादन खर्चामुळे त्रस्त असलेल्या शेतकऱ्यांवर या आपत्तीमुळे दुहेरी संकट ओढवले आहे.
स्थानिक शेतकऱ्यांकडून पंचनामा करून तातडीने नुकसानभरपाई देण्याची मागणी करण्यात येत आहे. प्रशासनाने तात्काळ दखल घेऊन शेतकऱ्यांना दिलासा द्यावा, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
अवकाळी पावसाच्या या तडाख्यामुळे संपूर्ण परिसरात हळहळ व्यक्त होत असून शेतकरी वर्ग चिंतेत आहे.
तालुक्यात मागील दोन दिवसांपासून ढगाळ वातावरण निर्माण झाले असून काही भागांत तुरळक पाऊस तर काही ठिकाणी गारपीटही झाल्याने शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. अवकाळी पावसाच्या शक्यतेमुळे शेतकरी चिंताग्रस्त झाले असून काढणीला आलेल्या पिकांची घाईघाईने कापणी सुरू करण्यात आली आहे.
यंदा परिसरात पावसाची समाधानकारक साथ मिळाल्याने शिवारात पाणीसाठा मुबलक आहे. त्यामुळे रब्बी हंगामातील पेरणी क्षेत्रात वाढ झाली असून गहू, ज्वारी, हरभरा, कांदा व हळद ही पिके चांगल्या स्थितीत उभी आहेत. काही ठिकाणी काढणी पूर्ण करून गंजी उभ्या करण्यात आल्या आहेत, तर काही ठिकाणी पिके मळणी करून राशी स्वरूपात शेतात पडलेल्या आहेत.
मात्र, मागील दोन दिवसांपासून अवकाळीचे सावट निर्माण झाल्याने शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे. अनेक ठिकाणी काढणी केलेला गहू व हरभरा गंज लावून ठेवण्यात आला असून अचानक पावसामुळे नुकसान होण्याची भीती आहे. काही भागांत झालेल्या हलक्या पावसामुळे शेतकऱ्यांनी तातडीने ताडपत्र्यांचा आधार घेत पिकांचे संरक्षण करण्याचा प्रयत्न सुरू केला आहे.
निसर्गाच्या अनिश्चिततेमुळे शेतमालाचे नुकसान होऊ नये, यासाठी शेतकरी सतर्क झाले असून उभ्या कांद्यालाही अवकाळीचा फटका बसण्याची शक्यता वर्तवली जात आहे. आकाशात सतत ढगांची गर्दी दिसत असल्याने शेतकरी वर्गात धास्तीचे वातावरण आहे.
चौकट :
“यंदा रब्बी पिकांसाठी मुबलक पाणीसाठा उपलब्ध झाल्याने शेतकरी वर्गात उत्साहाचे वातावरण होते. मात्र, गेल्या दोन दिवसांपासून अवकाळीचे संकट उंबरठ्यावर आले आहे. जर अवकाळी पाऊस झाला, तर रब्बी पिकांचे मोठे नुकसान होण्याची भीती आहे.”
— शेतकरी कैलास सरकटे

