ठाणे प्रतिनिधी (नागेश पवार)
नागपूर: केंद्रातील भाजप सरकार आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या (RSS) धोरणांचा निषेध करण्यासाठी वंचित बहुजन आघाडी, काँग्रेस, आम आदमी पक्ष, कम्युनिस्ट पक्ष आणि इतर समविचारी पक्षांच्या वतीने नागपुरात आरएसएस मुख्यालयावर ‘विशाल जन आक्रोश संयुक्त मोर्चा’ काढण्यात आला. या मोर्चामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर अत्यंत गंभीर आरोप करत त्यांच्या राजीनाम्याची आणि आरएसएसने भूमिका स्पष्ट करण्याची मागणी करण्यात आली.
या मोर्चामध्ये उपस्थितांना मार्गदर्शन करताना नेत्यांनी पंतप्रधान मोदींवर थेट निशाणा साधला. पंतप्रधान मोदींचे नाव वादग्रस्त ‘एपस्टाईन फाईल’मध्ये आले असल्याचा खळबळजनक दावा मोर्चेकऱ्यांकडून करण्यात आला. तसेच, अमेरिकेच्या दबावाखाली येऊन मोदी सरकारने देशविरोधी व्यापार करार केले असून, भारताचे सार्वभौमत्व अमेरिकेकडे गहाण ठेवल्याचा गंभीर आरोप करण्यात आला.

या करारांमुळे देशातील शेतकरी, कामगार, मजूर आणि भारतीय उत्पादनांवर अत्यंत विपरित परिणाम होत आहे. त्यामुळे ही लढाई आता केवळ रस्त्यावर न ठेवता तालुका आणि जिल्हा पातळीवर नेऊन व्यापक जनजागृती करण्याचे आवाहन नेत्यांनी जनतेला केले.
”स्वतःला देशभक्त म्हणवणारा आरएसएस आता गप्प का?”
मोर्चेकऱ्यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघालाही (RSS) धारेवर धरले. “आरएसएसनेच नरेंद्र मोदींना पंतप्रधान पदावर बसवले आहे. आज मोदी ब्लॅकमेल होऊन देशाच्या विरोधात निर्णय घेत आहेत, मग अशा वेळी स्वतःला देशभक्त म्हणवणारा आरएसएस गप्प का आहे?” असा थेट सवाल उपस्थित करण्यात आला. तसेच, “मोदींना अजूनही पंतप्रधानपदी का कायम ठेवले आहे, याबाबत आरएसएसने आपली भूमिका तातडीने स्पष्ट करावी,” अशी मागणीही आंदोलकांनी केली.
हा विशाल जन आक्रोश मोर्चा शांततापूर्ण मार्गाने आरएसएस मुख्यालयाच्या दिशेने पुढे जात होता. मात्र, कायदा आणि सुव्यवस्थेचे कारण देत पोलीस प्रशासनाने हा मोर्चा मध्येच अडवला.
घोषणाबाजी आणि फलकांनी वेधले लक्ष
छायाचित्रांमध्ये दिसल्याप्रमाणे या मोर्चात हजारो नागरिक आणि कार्यकर्त्यांचा जनसागर उसळला होता. आंदोलकांच्या हातात “RSS मुर्दाबाद”, “ब्लॅकमेल की सरकार!”, “गल्ली-गल्ली में शोर है, सत्ता का असली मालिक कोई और है!”, आणि “पग घुंघरू बांध मोदी नाचा रे!” अशा आशयाचे फलक होते, ज्यातून केंद्र सरकारबद्दलचा तीव्र संताप व्यक्त होत होता.
या आंदोलनात काँग्रेसचे नेते हर्षवर्धन सपकाळ यांच्यासह वंचित बहुजन आघाडी, काँग्रेस, आम आदमी पक्ष आणि कम्युनिस्ट पक्षाचे अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

