पालघर प्रतिनिधी : मिलिंद चुरी
पालघर :-जिल्हा परिषद पालघर येथील जननायक बिरसा मुंडा सभागृहात आज आदर्श ग्रामसेवक, आदर्श ग्रामपंचायत अधिकारी तसेच वनराई पुरस्कार वितरण समारंभ उत्साहात पार पडला. पालकमंत्री तथा राज्याचे वनमंत्री गणेश नाईक यांच्या हस्ते पुरस्कारांचे वितरण करण्यात आले.
या कार्यक्रमास आमदार राजेंद्र गावित, माजी जिल्हा परिषद अध्यक्ष प्रकाश निकम, जिल्हाधिकारी डॉ. इंदुराणी जाखड, मुख्य कार्यकारी अधिकारी मनोज रानडे यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते. उपमुख्य कार्यकारी अधिकारी (पंचायत) अशोक पाटील यांच्या नियोजनातून कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.
वनराई उपक्रमांतर्गत ग्रामपंचायतींना किमान पाच बंधाऱ्यांचे उद्दिष्ट देण्यात आले होते. या उपक्रमाला प्रतिसाद देत चहाडे ग्रामपंचायतीने १५ बंधारे उभारून आघाडी घेतली, तर भाताणे, आडणे व बऱ्हाणपूर ग्रामपंचायतींनी प्रत्येकी १२ बंधारे उभारले. एकूण ३८ ग्रामपंचायतींना या उपक्र
मासाठी गौरविण्यात आले.
याशिवाय सन २०२२-२३ व २०२३-२४ मधील आदर्श ग्रामसेवक तसेच सन २०२४-२५ मधील आदर्श ग्रामपंचायत अधिकारी पुरस्कारांचे वितरण करण्यात आले. काही वर्षांपासून प्रलंबित असलेले पुरस्कार वितरित झाल्याने संबंधितांमध्ये समाधान व्यक्त करण्यात आले.
पालकमंत्री गणेश नाईक यांनी प्रशासनाने जात, धर्म किंवा पक्षभेद न पाहता सर्वसामान्य नागरिकांपर्यंत सुविधा पोहोचवाव्यात, असे सांगितले. वनराईसारख्या उपक्रमांमुळे जलसंधारणाला चालना मिळून ग्रामीण विकास अधिक बळकट होत असल्याचे त्यांनी नमूद केले.
आमदार राजेंद्र गावित यांनी ग्रामविकासासाठी लोकप्रतिनिधी, ग्रामसेवक व प्रशासन यांच्यातील समन्वय महत्त्वाचा असल्याचे सांगितले. जिल्हाधिकारी डॉ. इंदुराणी जाखड यांनी शाश्वत विकासासाठी लोकसहभाग आवश्यक असल्याचे अधोरेखित केले.
मुख्य कार्यकारी अधिकारी मनोज रानडे यांनी वनराई अंतर्गत १००० बंधाऱ्यांचे उद्दिष्ट ओलांडून ११२८ बंधारे उभारण्यात आल्याची माहिती दिली. ‘निपुण पालघर’ उपक्रमाद्वारे विद्यार्थ्यांच्या पायाभूत साक्षरतेसाठी विशेष प्रयत्न सुरू असल्याचेही त्यांनी नमूद केले.
दरम्यान, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी रवींद्र शिंदे यांचा सेवेनिवृत्ती निमित्त सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे आभार उपमुख्य कार्यकारी अधिकारी इजाज अहमद यांनी मानले.
