भोंदू बाबा अशोक खरातच्या मुलीची लग्नपत्रिका समोर येताच बडा नेता काय म्हणाला?
नाशिकमधील भोंदू बाबा अशोक खरात प्रकरणी आता विविध राजकीय नेत्यांचे कनेक्शन समोर येऊ लागले आहेत. त्यातच आता अशोक खरातच्या मुलीच्या लग्नाची निमंत्रण पत्रिका विशेष तपास पथकाच्या (SIT) रडारवर आली आहे.
यामुळे राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे. अशोक खरातच्या मुलीच्या लग्नपत्रिकेत राज्यातील सत्ताधारी आणि विरोधी पक्षातील अनेक दिग्गज नेत्यांची नावे प्रमुख पाहुणे म्हणून छापण्यात आली होती. या पार्श्वभूमीवर राज्याचे ज्येष्ठ नेते चंद्रकांत पाटील यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे. यावेळी त्यांनी काहीही माहिती नाही, असे स्पष्ट केले आहे.
चंद्रकांत पाटील काय म्हणाले?
चंद्रकांत पाटील यांनी नुकतंच प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांना खरातच्या मुलीच्या लग्नाच्या निमंत्रण पुत्रिकेवर नाव टाकण्याबद्दल विचारण्यात आले होते. यावर त्यांनी स्पष्टपण प्रतिक्रिया दिली आहे. लग्न… मला काही माहिती नाही. ती आपली ग्रामीण पद्धत आहे. तुझ्या घरच्या लग्नाला तू माझं नाव टाक. पण त्यात येणार की नाही येणार, विचारलं की नाही विचारलं. त्याऐवजी एक प्रतिष्ठा असते की इतक्या सर्व जणांना निमंत्रण दिलं. मला आताच कळलं की माझं नाव त्या पत्रिकेवर होतं, असे चंद्रकांत पाटील म्हणाले.
यानंतर त्यांनी अशोक खरात प्रकरणावर अधिक भाष्य करणे टाळलं. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यापूर्वीच अर्थसंकल्पीय अधिवेशनात या प्रकरणावर दोन वेळा सविस्तर निवेदन दिले आहे, त्यामुळे मी काही बोलणार नाही, असे ते म्हणाले.
४० ते ४५ बडे राजकीय नेते अशोक खरातच्या संपर्कात
दरम्यान SIT च्या तपासात अनेक धक्कादायक खुलासे समोर आले आहेत. अशोक खरात केवळ महिलांचे शोषणच करत नव्हता, तर त्याचे राजकीय धागेदोरे अत्यंत खोलवर पसरले असल्याचे SIT च्या तपासातून समोर आले आहे. अशोक खरातच्या संपर्कात सुमारे ४० ते ४५ बडे राजकीय नेते होते. त्याने या नेत्यांचे मोबाईल नंबर खऱ्या नावाने न ठेवता कोडवर्डमध्ये जतन केले होते. अनेक नेते निवडणुकीचा अर्ज भरण्याची वेळ आणि तारीख ठरवण्यासाठी खरातचा सल्ला घेत असतं, अशी माहिती समोर आली आहे.
फॉरेन्सिक टीमकडून मिळालेल्या अशोक खरातच्या मोबाईल क्लोन डेटामध्ये अनेक आक्षेपार्ह व्हिडीओ, ऑडिओ क्लिप्स आणि चॅट्स मिळाल्याची शक्यता आहे. खरातवर आतापर्यंत १० गुन्हे दाखल असून त्यातील ८ गुन्हे लैंगिक अत्याचाराचे आहेत. तसेच त्याची १५०० कोटींची मालमत्ता पोलिसांच्या रडारवर आहे. सध्या न्यायालयाने अशोक खरातची पोलीस कोठडी १ एप्रिलपर्यंत वाढवली आहे. त्यामुळे अशोक खरातच्या संपर्कात असलेल्या नेत्यांची आणि त्याला मदत करणाऱ्या साथीदारांची सखोल चौकशी करण्यात येणार असल्याचे बोललं जात आहे.
