राज्यात इलेक्ट्रिक वाहनांचा वापर वाढवून पर्यावरणपूरक वाहतूक व्यवस्थेला गती देण्यासाठी महाराष्ट्र शासनाने महत्त्वपूर्ण पाऊल उचलले आहे. महाराष्ट्र इलेक्ट्रिक वाहन धोरण-2025 अंतर्गत विविध घटकांना प्रोत्साहनपर निधी वितरित करण्यास शासनाने मंजुरी दिली आहे, अशी माहिती परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिली आहे.
या निर्णयानुसार, ई-वाहनांच्या मागणीला चालना देण्यासाठी उत्पादक कंपन्यांना मोठ्या प्रमाणावर अनुदान देण्यात आले आहे. यात Bajaj Auto Ltd., Mahindra Electric Mobility Ltd. आणि Euler Motors Pvt. Ltd. यांना तीन चाकी वाहनांसाठी एकूण ₹2.51 कोटींहून अधिक निधी मंजूर करण्यात आला आहे.
तसेच, राज्यातील प्रमुख शहरी वाहतूक उपक्रमांनाही या योजनेचा लाभ मिळणार आहे. BEST (मुंबई), नागपूर महानगरपालिका (NMT), पुणे महानगरपालिका (PMPL), कल्याण-डोंबिवली महानगरपालिका, नवी मुंबई महानगरपालिका (NMMT) आणि ठाणे महानगरपालिका (TMT) या सहा उपक्रमांना मिळून ₹४.५५ कोटींचा निधी देण्यात आला आहे. यामुळे शहरांमध्ये सार्वजनिक ई-वाहतूक अधिक सक्षम होणार आहे. याशिवाय, Ather Energy Pvt. Ltd., TVS Motor Co., Chetak Technology आणि इतर कंपन्यांना ई-दुचाकी व ई-तीनचाकी वाहनांसाठी एकूण ₹4.45 कोटींपेक्षा अधिक प्रोत्साहन रक्कम वितरित करण्यात येणार आहे.
शासनाने स्पष्ट केले आहे की, हा निधी 2025-26 च्या अर्थसंकल्पीय तरतुदीतून उपलब्ध करून देण्यात आला आहे. तसेच सन 2026-27 या आर्थिक वर्षासाठी ई-वाहनांना प्रोत्साहन देण्यासाठी 246 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. या निर्णयामुळे राज्यातील ई-वाहन क्षेत्राला मोठी चालना मिळणार असून, प्रदूषण कमी करण्याच्या दृष्टीनेही हा महत्त्वाचा टप्पा मानला जात आहे. असे प्रतिपादन परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी केले.
