आता सातारा जिल्ह्यातील ‘या’ भागातून सुसाट धावणार गाड्या; जयकुमार गोरेंनी दिली महत्त्वाची अपडेट…
शक्तिपीठ महामार्ग माझ्या माण- खटावमधून जाणार असल्याने या भागातील दळणवळण वाढून विकासाला चालना मिळणार आहे. आमची तीर्थक्षेत्रे इतर तीर्थक्षेत्रांना जोडली जाणार आहेत.
मतदारसंघात ग्रीन कॉरिडॉर एमआयडीसी उभी राहात आहे.
विविध पाणी योजनांचे पाणी येत आहे. दुष्काळमुक्ती अंतिम टप्प्यात येऊन विकासाची विविध दालने खुली होत असतानाच आता शक्तिपीठ महामार्ग आमच्यासाठी मोठ्या विकासाचा महामार्ग ठरणार आहे, असा विश्वास ग्रामविकासमंत्री जयकुमार गोरे यांनी पत्रकाद्वारे व्यक्त केला.
मंत्री गोरे यांनी म्हटले आहे, राज्य सरकारने नागपूर- गोवा द्रुतगती (शक्तिपीठ) महामार्गाच्या आराखड्याला एप्रिल २०२४ मध्ये मान्यता दिली होती. तेव्हाच्या मान्यतेनुसार हा महामार्ग वर्धा, यवतमाळ, नांदेड, हिंगोली, परभणी, धाराशिव, सोलापूर, सांगली, कोल्हापूर, सिंधुदुर्ग या १२ जिल्ह्यांतून जाणार होता. ८०२ किमी लांबीच्या महामार्ग आराखड्याला काही जिल्ह्यातून तीव्र विरोध करण्यात आला होता.
ऑक्टोबर २०२४ मध्ये कोल्हापूर जिल्ह्यातील भूसंपादन अधिसू्चना रद्द करण्यात आली होती. शक्तिपीठ महामार्गाच्या पर्यायी आखणीबाबत सर्वेक्षण करण्याच्या सूचना रस्ते विकास महामंडळाला देण्यात आल्या होत्या. दरम्यान, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत एकत्रित विमानप्रवास करताना शक्तिपीठ महामार्गाच्या नवीन आराखड्याबाबत चर्चा झाली होती.
पूर्वीच्या नागपूर-गोवा महामार्गाच्या आसपासच्या परिसरातूनच शक्तिपीठ महामार्गाचा बराच भाग जात असल्याचे, तसेच त्या भागात अगोदरच दळणवळणाची साधने मोठ्या प्रमाणावर उपलब्ध असल्याचे निदर्शनास आणून दिले. ज्या भागात दळणवळणाची साधने कमी आहेत, जो भाग विकासापासून वंचित आहे त्या भागातून शक्तिपीठ महामार्ग जावा, जेणेकरून त्या भागातील कनेक्टिव्हिटी आणखी वाढेल, अशीही अपेक्षा व्यक्त केली होती.
नवीन आराखड्यात सोलापूर जिल्ह्यानंतर सातारा जिल्ह्यातील माण- खटावमधून शक्तिपीठ महामार्ग गेला, तर शिखर शिंगणापूर, गोंदवले ही तीर्थक्षेत्रे इतर तीर्थक्षेत्रांना जोडली जाणार असल्याचे त्यांनी मुख्यमंत्र्यांच्या निदर्शनास आणून दिले.
शक्तिपीठ महामार्गाबाबत सुचवलेल्या प्रस्तावावर मुख्यमंत्री फडणवीस यांनी सकारात्मक निर्णय घेतला. रस्ते विकास महामंडळाच्या प्रत्यक्ष पाहणी झाल्यानंतर नवीन पर्यायी आखणीला मंजुरी देण्यात आली. नवीन आराखड्यानुसार शक्तिपीठ महामार्ग माण-खटाव मतदारसंघातून जाणार असल्याचे जाहीर होताच दोन्ही तालुक्यांत जल्लोष करण्यात आला.
