अमेरिकेचे २ लढाऊ विमाने पाडल्यानंतर इराणने उडवली डोनाल्ड ट्रम्प यांची खिल्ली…
इराणी संसदेचे अध्यक्ष मोहम्मद बघेर गालीबाफ यांनी अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर जोरदार निशाणा साधला आहे. अमेरिका आणि इस्रायलने तेहरानवर केलेल्या संयुक्त हल्ल्याला त्यांनी ‘विना-रणनीतीचे युद्ध’ असे संबोधले.
इराणने एकाच दिवसात अमेरिकेची दोन लष्करी विमाने F-15 आणि A-10 पाडल्याचा आणि दोन ब्लॅक हॉक हेलिकॉप्टरवर हल्ला केल्याचा दावा केल्यानंतर ही टिप्पणी आली आहे.
गालीबाफ यांनी ‘X’ वर पोस्ट करत म्हटले की, ‘इराणला सलग ३७ वेळा पराभूत केल्यानंतर, त्यांनी सुरू केलेल्या या उत्कृष्ट विना-रणनीती युद्धाची पातळी आता ‘सत्तापालट’ वरून ‘कोणी आमच्या वैमानिकांना शोधू शकेल का? प्लीज?’ इथपर्यंत खाली घसरली आहे.’ त्यांनी यासोबत एक विनवणी करणारा इमोजी देखील वापरला आणि उपरोधिकपणे म्हटले, ‘वा, काय ही प्रगती! अगदी अलौकिक बुद्धिमत्ता!
२८ फेब्रुवारी रोजी अमेरिका आणि इस्रायलने इराणविरुद्ध संयुक्त लष्करी मोहीम राबवली होती, ज्यामध्ये सर्वोच्च नेते आयतुल्ला अली खामेनी यांचा मृत्यू झाला. त्यापूर्वी संरक्षण मंत्री अझीझ नसीरझादे यांच्यासह अनेक वरिष्ठ लष्करी नेत्यांना लक्ष्य करण्यात आले होते. खामेनी यांच्या निधनानंतर त्यांचा मुलगा मोजताबा याने इराणचे नेतृत्व स्वीकारले आहे.
ट्रम्प यांची बदलती भूमिका
१ एप्रिल रोजी ‘ट्रुथ सोशल’वर डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणच्या नवीन अध्यक्षांचे वर्णन ‘कमी कट्टरपंथी आणि अधिक बुद्धिमान’ असे केले होते. मात्र, गुरुवारी राष्ट्राला संबोधित करताना ट्रम्प म्हणाले की, ‘सत्तापालट (Regime change) हे आमचे उद्दिष्ट नव्हते… परंतु त्यांच्या मूळ नेत्यांच्या मृत्यूमुळे सत्तापालट झाला आहे.’ त्यांनी इराणी राजवटीला ‘गुंड आणि खुनी’ संबोधत, इराणला अण्वस्त्रे मिळवू देणार नाही, असा पुनरुच्चार केला.
इराणचा दावा काय?
इराणने शुक्रवारी दावा केला की त्यांनी अमेरिकेचे एक F-15 लढाऊ विमान आणि एक A-10 विमान पाडले आहे. अमेरिकन माध्यमांच्या वृत्तानुसार, F-15 मधील दोन क्रू मेंबर्सपैकी एकाला वाचवण्यात यश आले असून दुसऱ्याचा शोध सुरू आहे. तर A-10 विमान कुवेतच्या हवाई हद्दीत कोसळले असून त्याचा वैमानिक सुरक्षित आहे. याशिवाय, शोध मोहिमेत सहभागी असलेल्या दोन ब्लॅक हॉक हेलिकॉप्टरनाही इराणने लक्ष्य केल्याचे वृत्त आहे.
