शिर्डीतील माजी नगराध्यक्ष-उपनगराध्यक्षांसह साई संस्थानचा माजी विश्वस्त चौकशीच्या फेऱ्यात…
नाशिकमधील विकृत भोंदूबाबा अशोक खरात याने विशेष तपास पथकासमोर तोंड उघडण्यास सुरवात केली आहे. यातून पथकासमोर अनेक खुलासे होत असून, तपासाचा वेग येत आहे.
विशेष पथकाचा तपास आता अशोक खरात याने भोंदूगिरीतून उभ्या केलेल्या आर्थिक नेटवर्कवर वळला आहे. यातून शिर्डी नगरपंचायतीचे माजी नगराध्यक्ष, उपनगराध्यक्ष, माजी नगरसेवक यांना विशेष पथकाने चौकशीसाठी नोटिसा बजावल्या आहेत. साई संस्थानचा एक माजी विश्वस्त देखील चौकशीच्या रडारवर आहे.
अशोक खरात आणि त्याची पत्नी कल्पना खरात हिच्यासह पाच जणांविरोधात शिर्डीत(Shirdi)बेकायदेशीर सावकारकी आणि जमीन व्यवहारात फसवणुकीचा गुन्हा दाखल झाला आहे. अरविंद बावके आणि किरण सोनवणे या दोघांना अटक आहे. या दोघांची आज पोलिस कोठडी संपत असल्याने त्यांना न्यायालयासमोर हजर करण्यात येणार आहे.
अरविंद बावके यांनी पोलिस कोठडीत अशोक खरात (Ashok Kharat)याच्या आर्थिक व्यवहारांची माहिती दिल्याचं समोर येत आहे. यातूनच शिर्डी (Shirdi) पोलिसांनी दोन पतसंस्थांमधील अशोक खरात याचे शेकडो खाते उघडकीस आणून त्यावरील कोट्यवधींचा आर्थिक व्यवहार उघडकीस आणला.
यातील काही खातेदार आता समोर येत असून, या खात्यांविषयी आम्हाला काहीच माहिती नव्हती, असा जबाब नोंदवला आहे. तसं पहिल्यास या खात्यांना वारसदार आणि संपर्कासाठी अशोक खरात याचा मोबाईल क्रमांक होता. ही खाते सुरू करताना अनेकांच्या बनावट सह्या करण्यात आल्या आहेत. या सह्यांमागे अरविंद बावके हा असल्याचं समोर येत आहे.
शिर्डीत मोठी उलाढाल
अशोक खरात याचा शिर्डीत मोठा भक्त परिवार होता. त्यामुळे त्याचे सर्वाधिक आर्थिक व्यवहार आणि मालमत्ता खरेदी-विक्रीचे व्यवहार तिथंच सुरू असायचे. तो अनेक भक्तांच्या मालमत्ता खरेदी-विक्रीत भागीदार असल्याचं देखील पोलिस तपासात समोर येत आहे. शिर्डी पोलिसांनी साई संस्थानचा माजी विश्वस्त आणि ईशान्येश्वर मंदिराचा उपाध्यक्ष यांच्याकडे चौकशी सुरू केली आहे. यात यांचा जबाब देखील नोंदवल्याचे समोर येत आहे.
दोन माजी नगराध्यक्षांचा जबाब झाला
विशेष पथकासमोर शिर्डीतील दोन माजी नगराध्यक्षांनी जबाब देखील नोंदवल्याचं समोर येत आहे. अशोक खरात याने भोंदूगिरीतून मोठं आर्थिक नेटवर्क उभं केलं होतं. मुंबईतील एका पंचतारांकित हाॅटेलमधून तो हवाला देखील चालवायचा, असं समोर येत आहे. यासाठी संबंधित हाॅटेलमधील एक खोली कायम आरक्षित असायची असे सांगितले जात आहे. विशेष पथकाकडून तपास सुरू असतानाच, ईडीची देखील तपासात एन्ट्री होणार असल्याने अनेकांच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे.
