डोणगाव प्रतिनिधी –सालार बेग
डोणगाव येथे हजरत हसन अली शाह बाबा सरकार यांचा पवित्र संदल सोहळा मोठ्या उत्साहात आणि भक्तिमय वातावरणात पार पडला. या सोहळ्यात गावातील तसेच परिसरातील भाविकांनी मोठ्या संख्येने सहभाग घेतला.
संदल मिरवणुकीची सुरुवात सज्जादा नशीन करीम अली शाह यांच्या घरातून करण्यात आली. तेथून मिरवणूक मोठ्या उत्साहात गावातील प्रमुख मार्गांवरून काढण्यात आली.
संदल मिरवणुकीत आकर्षण ठरले ते आठ घोडे, चार उंट आणि एक भव्य रथ. तसेच डीजेच्या तालावर चार संदल मिरवणुका निघाल्यामुळे संपूर्ण परिसर उत्साहाने भारून गेला. यासोबतच ढोल वाजवणारी टीमही उपस्थित होती, ज्यांच्या दमदार तालांमुळे मिरवणुकीला वेगळाच रंग चढला.
पारंपरिक ढोल-ताशा, धार्मिक घोषणा आणि भक्तीगीतांमुळे वातावरण अधिकच पवित्र व आनंददायी झाले.
संदल दर्ग्यावर पोहोचल्यावर मजार शरीफवर शाल व फुलांची चादर अर्पण करण्यात आली. त्यानंतर फातेहा खानी करण्यात आली. या वेळी भाविकांनी मोठ्या श्रद्धेने बाबा सरकारांना मानाचा मुजरा अर्पण केला.
तसेच कार्यक्रमाच्या शेवटी सर्व भक्तांना प्रसाद वाटप करण्यात आले. या संपूर्ण कार्यक्रमादरम्यान पोलीस प्रशासनाने चोख बंदोबस्त ठेवत उत्तम सहकार्य केले.
संपूर्ण सोहळा शांततेत आणि शिस्तबद्ध पद्धतीने पार पडला असून, सर्व धर्मीयांनी एकत्र येत एकोपा आणि बंधुभावाचे सुंदर उदाहरण घालून दिले.
