प्रतिनिधी / स्वाती हडकर
चिपळूण : परशुराम एज्युकेशन सोसायटी संचलित युनायटेड इंग्लिश स्कूल, चिपळूण येथे वनौषधी विभागातर्फे आयोजित ‘मनाचे श्लोक’ पाठांतर स्पर्धेचा पारितोषिक वितरण समारंभ २ एप्रिल २०२६ रोजी गुरुदक्षिणा सभागृहात उत्साहात संपन्न झाला.
१९८८ सालापासून शालेय अभ्यासक्रमात आयुर्वेद अंतर्गत वनौषधी हा विषय सुरू असून सलग ३८ वर्षे विद्यार्थ्यांना स्वास्थ्य, निसर्गस्नेही जीवनशैली आणि आरोग्यदायी सवयी यांचे मार्गदर्शन दिले जात आहे. दासनवमी निमित्त चिपळूण वैद्य मंडळातर्फे ५वी ते ७वी व ८वी ते ९वी अशा दोन गटांत ‘मनाचे श्लोक’ स्पर्धा घेण्यात आली होती. विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला.
समारंभासाठी शाळेचे माजी मुख्याध्यापक श्री. कानडे सर प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते. वैद्य मंडळाचे अध्यक्ष डॉ. रत्नाकर तसेच आयुर्वेदातील एम.डी. पदवीप्राप्त डॉ. दिव्या बैकर यांची विशेष उपस्थिती लाभली. संचालिका सौ. सारिका भावे मॅडम यांनीही कार्यक्रमास हजेरी लावली.
लहान गटात कार्तिक मालशे (प्रथम), राशी रहाटे (द्वितीय), साईशा झुजम (तृतीय) व देवेश थत्ते (उत्तेजनार्थ), तर मोठ्या गटात साची पाटणे (प्रथम), स्पृहा चव्हाण (द्वितीय), स्नेहा पवार (तृतीय) व किमया ओक (उत्तेजनार्थ) यांनी यश संपादन केले. विजेत्यांना कै. रमेश महादेव कानेटकर यांच्या स्मरणार्थ रोख रक्कम व प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले.
कार्यक्रमाची सुरुवात प्रार्थना, दीपप्रज्वलन व पूजनाने झाली. उपमुख्याध्यापिका सौ. कारदगे मॅडम यांनी प्रास्ताविक केले. प्रमुख अतिथींसह मान्यवरांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करत वनौषधी विषयाचे महत्त्व अधोरेखित केले. मुख्याध्यापक श्री. बनसोडे सर यांनी विषयासाठी सर्वतोपरी सहकार्याचे आश्वासन दिले.
सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन सौ. पेढांबकर मॅडम यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी शिक्षकवृंद व पर्यवेक्षक यांचे सहकार्य लाभले.
