चिपळूण : प्रतिनिधी स्वाती हडकर
चिपळूण नगर परिषद चे प्रशासकीय अधिकारी मंगेश पेढाबंकर यांना त्यांच्या कर्तव्यदक्ष, प्रामाणिक, लोकाभिमुख आणि संवेदनशील कार्याची दखल घेत नवभारत–नवराष्ट्र वृत्तपत्र समूह तर्फे ‘आदर्श प्रशासकीय अधिकारी’ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
हा पुरस्कार शनिवारी सकाळी अतिथी हॉटेल येथील सभागृहात आयोजित दिमाखदार समारंभात प्रदान करण्यात आला.
या सोहळ्यास शेखर निकम, भाजप नेते प्रशांत यादव, चिपळूण नागरी सहकारी पतसंस्था चे संस्थापक अध्यक्ष सुभाष चव्हाण, मुख्य कार्यकारी अधिकारी स्वप्ना यादव, उपनगराध्यक्ष रूपाली दांडेकर, अभिनेत्री साक्षी गांधी, मानसी पेढांबकर तसेच नवराष्ट्र मीडियाचे अधिकारी व विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.
मंगेश पेढाबंकर यांनी प्रशासनात काम करताना प्रत्येक नागरिकाच्या समस्येकडे केवळ कागदोपत्री विषय म्हणून न पाहता ती जबाबदारी म्हणून स्वीकारण्याची कार्यशैली जोपासली आहे. सामान्य नागरिकांच्या अडचणी समजून घेत त्या सोडवण्यासाठी तत्परतेने काम करणारा अधिकारी म्हणून त्यांनी विश्वासार्ह ओळख निर्माण केली आहे.
त्यांनी रत्नागिरी नगर परिषद तसेच गुहागर नगर पंचायत येथेही विविध जबाबदाऱ्या यशस्वीपणे पार पाडल्या आहेत. बदल्या, पदोन्नती आणि विविध प्रशासकीय जबाबदाऱ्यांच्या प्रवासात त्यांनी शिस्त, कार्यतत्परता आणि जनहिताचा दृष्टिकोन कायम ठेवला.
संकटसमयी प्रत्यक्ष घटनास्थळी जाऊन पाहणी करणे, तक्रारींना त्वरित प्रतिसाद देणे आणि प्रशासनाला मानवी चेहरा देण्याचा प्रयत्न हा त्यांच्या कार्यपद्धतीचा महत्त्वाचा भाग राहिला आहे.
प्रशासकीय सेवेसोबतच सामाजिक, सहकारी आणि सांस्कृतिक क्षेत्रातही त्यांनी सक्रिय योगदान दिले आहे. त्यामुळेच हा सन्मान केवळ वैयक्तिक गौरव नसून, प्रामाणिक आणि लोकाभिमुख प्रशासनाला मिळालेली दाद असल्याची भावना मान्यवरांनी व्यक्त केली
