व्हाईट हाऊसच्या सचिव कॅरोलिन लॅव्हिट यांचा दावा !
अमेरिकेने इराणशी शस्त्रसंधी केल्याची घोषणा बुधवारी केली होती. इस्रायलने या निर्णयावर नाराजी व्यक्त केली. तसंच लेबनॉनवर हल्लेही केले. ज्यानंतर इराणने होर्मुज स्ट्रेट बंद करण्याची घोषणा केली.
अमेरिकेने हे सांगावं की त्यांना शस्त्रसंधी हवी आहे की इस्रायलच्या आडून युद्ध लढायचं आहे असं इराणने म्हटलं आहे. इस्रायलच्या कारवाईमुळे डोनाल्ड ट्रम्प यांनाही टीका सहन करावी लागते आहे.दरम्यान याबाबत व्हाईट हाऊसकडून स्पष्टीकरण देण्यात आलं आहे.
डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर अमेरिकेतूनच होते आहे टीका
अमेरिकेतील सिनेटरने डोनाल्ड ट्रम्प हे राष्ट्राध्यक्षपदासाठी मानसिकदृष्ट्या अनफिट आहेत आणि त्या पदावरुन हटवलं गेलं पाहिजे असं आवाहन केलं होतं. डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर ही टीका होते आहे कारण त्यांनी इराणचा १० कलमी प्रस्ताव मान्य केल्याची चर्चा माध्यमांमध्ये रंगली होती. क्रिस मर्फी यांनी एक दिवस आधीच ट्रम्प यांनी गुडघे टेकल्याची टीका केली होती. दरम्यान आता व्हाईट हाऊसने या सगळ्या प्रकरणी स्पष्टीकरण दिलं आहे. व्हाईट हाऊसच्या वार्ता सचिव कॅरोलिन लॅव्हिट यांनी हा दावा केला आहे की डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणचा १० कलमी प्रस्तावाचा कागद कचरापेटीत फेकला. इराणकडून एक प्रस्ताव आला त्याच्यावर चर्चा होऊ शकते असं ट्रम्प यांनी म्हटल्याचं त्यांनी सांगितलं तसंच इराणने होर्मुज स्ट्रेट खुलं करण्याची सहमती दर्शवल्याने शस्त्रसंधी झाली असंही त्या म्हणाल्या.
कॅरोलिन लॅव्हिट यांनी आणखी काय सांगितलं?
कॅरोलिन लॅव्हिट म्हणाल्या इराणने सुरुवातीला १० कलमी प्रस्ताव पाठवला होता. तो गंभीर अटी असलेला होता, स्वीकारार्ह नव्हता. त्यामुळे तो ट्रम्प यांनी रद्द केला आणि कचरापेटीत फेकला. लॅव्हेट असंही म्हणाल्या की वार्तांकन करताना पत्रकारांनी काळजी घेतली पाहिजे कारण ते कुठल्याही बातम्या देत आहेत, आधी त्या बातमीची शहानिशा करा त्यानंतर ती बातम्या द्या असंही त्यांनी सांगितलं.
राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प हे अमेरिकेच्या हिताचाच निर्णय घेतील
राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणला काय हवं ती यादी तडजोड म्हणून स्वीकारलेली नाही, यापुढेही स्वीकारणार नाहीत. डोनाल्ड ट्रम्प अशीच तडजोड करतील ज्यात अमेरिकेचं हित असेल. त्यामुळे १० मागण्या मान्य केल्या वगैरे अशा बातम्यांवर विश्वास ठेवू नका असं कॅरोलिन लॅव्हिट यांनी स्पष्ट केलं.
