ठाणे प्रतिनिधी (नागेश पवार) ठाणे (08) : ठाणे महानगरपालिकेने आगामी जनगणना प्रक्रियेच्या अनुषंगाने व्यापक तयारी सुरू करण्यात केली आहे. या अनुषंगाने क्षेत्रीय प्रशिक्षकांचे टप्प्याटप्प्याने प्रशिक्षण आणि घरगणनेची प्रायोगिक अंमलबजावणीला सुरुवात करण्यात आली असून शहरातील विविध प्रभागांमध्ये नियोजनबद्ध पद्धतीने ही प्रक्रिया राबवली जात असल्याचे अतिरिक्त आयुक्त 2 प्रशांत रोडे यांनी नमूद केले आहे.
या कामासाठी नऊ प्रभाग समिती अंतर्गत एकूण ७८ फिल्ड ट्रेनर्स (क्षेत्रीय प्रशिक्षक) यांची नियुक्ती करण्यात आली असून, त्यापैकी ३९ प्रशिक्षकांना पहिल्या सत्रात प्रशिक्षण देण्यात आले. दिनांक 6 एप्रिल 2026 ते दि. 08 एप्रिल, 2026 रोजी सकाळी 9.00 ते संध्यकाळी 6.00 या वेळेत माजीवाडा-मानपाडा, उथळसर, लोकमान्य-सावरकर आणि वर्तकनगर या प्रभागांमध्ये प्रशिक्षण सत्र पार पडले. त्यानंतर दिनांक 09 एप्रिल 2026 ते दि. 11 एप्रिल, 2026 रोजी सकाळी 9.00 ते संध्यकाळी 6.00 या वागळे, नौपाडा-कोपरी, कळवा, मुंब्रा आणि दिवा या भागांतील क्षेत्रीय प्रशिक्षकांना प्रशिक्षण देण्यात येणार आहे.
याच पार्श्वभूमीवर आज उथळसर प्रभाग समितीमध्ये प्रायोगिक तत्वावर घरगणना (हाऊस लिस्टिंग) करण्यात आली. या उपक्रमातून प्रत्यक्ष जनगणनेदरम्यान येणाऱ्या अडचणींचा आढावा घेऊन, प्रक्रिया अधिक सुलभ आणि परिणामकारक करण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे.
प्रशिक्षण पूर्ण झाल्यानंतर हे क्षेत्रीय प्रशिक्षक त्यांच्या-त्यांच्या प्रभागांमध्ये प्रगणक आणि पर्यवेक्षक यांना सविस्तर प्रशिक्षण देणार आहेत. यामुळे जनगणनेची संपूर्ण साखळी सक्षमपणे कार्यरत राहील, असा विश्वास व्यक्त करण्यात येत आहे. यंदाच्या जनगणनेत डिजिटल प्रणालीचा वापर करण्यात येणार असून, एचएलओ (HLO) अॅपद्वारे घरगणना केली जाणार आहे. या अॅपमध्ये नागरिकांच्या घरासंदर्भातील सुमारे एकुण 33 प्रश्नांची नोंद केली जाईल. यामध्ये घराची मालकी, मालकाचे नाव, घराचे प्रकार तसेच घरात उपलब्ध असलेल्या सुविधा जसे की टीव्ही, फ्रिज, लादी, मोबाईल इत्यादींचा समावेश आहे.
याशिवाय, नागरिकांच्या सोयीसाठी 1 मे ते 15 मे या कालावधीत स्वयं जनगणना करण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहे. नागरिकांना जनगणना पोर्टलवर लॉगिन करून स्वतःची माहिती भरता येईल. माहिती भरल्यानंतर प्रत्येक नागरिकाला युनिक कोड प्रदान केला जाणार आहे. सदरचा युनिक कोड नागरिक घरी येणाऱ्या प्रगणकाला उपलब्ध करुन देतील व त्यानुसार त्याची घरगणना पूर्ण होईल.
स्वयं जनगणनेनंतर पुढील टप्प्यात 16 मेपासून प्रत्यक्ष जनगणना प्रक्रिया सुरू होणार आहे. या टप्प्यात प्रगणक घरोघरी भेट देऊन माहितीची पडताळणी आणि संकलन करणार आहे.
एकूणच, ठाणे महानगरपालिकेकडून जनगणना प्रक्रिया अधिक पारदर्शक, अचूक आणि तंत्रज्ञानाधारित करण्यासाठी ठोस पावले उचलली जात असून, नागरिकांच्या सक्रिय सहभागातून ही मोहीम यशस्वी होईल, असा विश्वास ठाणे महानगरपालिकेच्या जनगणना विभागाचे सहायक आयुक्त तथा नोडल अधिकारी सचिन बोरसे यांनी व्यक्त केला आहे.
