जालना प्रतिनिधी-आकाश माने
जालना : शहरातील राजपूत वाडी परिसरात रविवारी (दि. ५) दुपारी एक रहस्यमय घटना समोर आल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. विद्युत खांबाजवळील जमिनीतून ‘लाव्हा सदृश’ पदार्थ बाहेर पडत असल्याचे नागरिकांच्या निदर्शनास आले असून, या प्रकारामुळे परिसरात मोठी खळबळ उडाली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, दुपारी सुमारे ४ वाजताच्या सुमारास काही नागरिकांनी विद्युत खांबाजवळून गरम व चिकट स्वरूपाचा पदार्थ जमिनीतून बाहेर येताना पाहिला. या घटनेने घाबरलेल्या नागरिकांनी तत्काळ महावितरण विभागाशी संपर्क साधला. माहिती मिळताच महावितरणचे कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले आणि त्यांनी परिस्थितीचा आढावा घेत आवश्यक ती उपाययोजना सुरू केली.
घटनास्थळी उपस्थित असलेल्या काही नागरिकांनी हा प्रकार प्रत्यक्ष पाहिल्याचा दावा करत व्हिडिओ चित्रीकरणही केले आहे. या ‘लाव्हा सदृश’ पदार्थामुळे परिसरात भीतीचे वातावरण पसरले असून, नागरिकांनी खबरदारीचा उपाय म्हणून त्या ठिकाणापासून दूर राहणे पसंत केले.
दरम्यान, हा प्रकार नेमका कशामुळे घडला याबाबत अद्याप स्पष्टता आलेली नाही. विद्युत गळतीमुळे जमिनीत उष्णता निर्माण होऊन काही रासायनिक प्रतिक्रिया झाली असावी, किंवा इतर कोणते कारण असू शकते, असा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात आहे.
महावितरणच्या अधिकाऱ्यांकडून या घटनेचा सखोल तपास सुरू असून, लवकरच वस्तुस्थिती समोर येईल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. तोपर्यंत नागरिकांनी अफवांवर विश्वास न ठेवता सतर्क राहण्याचे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.
