आम आदमी पक्षात लवकरच मोठा भूकंप होण्याची शक्यता निर्माण झाली आहे आणि त्याचे संकेत पक्षाचे राज्यसभा खासदार राघव चड्ढा यांनीच दिल्याची चर्चा रंगली आहे. पक्षातील मतभेद वाढल्यापासून दिल्ली आणि पंजाबच्या राजकारणात चांगलीच खळबळ उडाली आहे.
आता त्यांच्या पुढील राजकीय पावलाकडे समर्थकांसह सर्वांचे लक्ष लागले आहे.
राघव चड्ढा यांनी सोशल मीडियावर केलेल्या एका पोस्टमुळे या चर्चांना अधिक उधाण आले आहे. त्यांनी इन्स्टाग्रामवर एक रील शेअर केली असून त्यातून ते नवीन राजकीय पक्ष स्थापन करण्याचा विचार करत असल्याचे संकेत मिळत आहेत. त्या रीलमध्ये @seedhathok या कंटेंट क्रिएटरने त्यांना स्वतःचा पक्ष सुरू करण्याचा सल्ला दिला होता. ही पोस्ट शेअर करताना चड्ढा यांनी ‘Interesting Thought’ अशी प्रतिक्रिया दिली.
या रीलमध्ये असे सुचवण्यात आले की, सध्याच्या परिस्थितीत त्यांनी स्वतःचा पक्ष स्थापन केला तर त्यांना मोठ्या प्रमाणात जनसमर्थन मिळू शकते. ‘Gen-Z पार्टी’ असे नावही सुचवण्यात आले असून देशातील तरुण वर्ग त्यांच्यामागे उभा राहू शकतो, असा दावा करण्यात आला. दुसऱ्या पक्षात जाण्यापेक्षा स्वतःचा पक्ष सुरू करणे त्यांच्यासाठी फायदेशीर ठरेल, असेही या व्हिडिओत सांगितले आहे.
दरम्यान, आम आदमी पक्षाने राघव चड्ढा यांची राज्यसभेतील पक्षाच्या उपनेतेपदावरून त्यांची हकालपट्टी करण्यात आली आणि त्यांच्या जागी अशोक कुमार मित्तल यांची नियुक्ती करण्यात आली. तसेच, सभागृहात बोलण्यासाठी दिला जाणारा वेळही त्यांना नाकारण्यात आला होता.
पक्षाकडून असा आरोप करण्यात आला की, चड्ढा यांचा कल भाजपकडे झुकलेला आहे. ते भाजपविरोधात ठाम भूमिका घेत नाहीत आणि महत्त्वाच्या राजकीय मुद्द्यांऐवजी किरकोळ विषयांवर लक्ष केंद्रित करतात. या सर्व घडामोडींमुळे आम आदमी पक्षात अंतर्गत संघर्ष वाढत असल्याचे स्पष्ट होत आहे. आता राघव चड्ढा खरोखरच नवीन पक्ष स्थापन करणार का, की पक्षातच राहून मतभेद मिटवणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
