अमेरिका आणि इस्राइलने पुकारलेल्या युद्धानंतर इराणने होर्मुझच्या सामुद्रधुनीची नाकेबंदी करत संपूर्ण जगाच्या नाकी नऊ आणले आहेत. एवढंच नाही तर युद्धविराम झाल्यानंतर इराणने आता होर्मुझमधून टोलवसुली करण्याची योजना आखली आहेत.
त्या पार्श्वभूमीवर भारतातील प्रसिद्ध बँकर अजय बग्गा यांनी भारताला महत्त्वाचा सल्ला दिला आहे. जर इराण होर्मुझमधून टोल वसूल करणार असेल तर भारतानेही दक्षिण अंदमान समुद्रातून जाणाऱ्या जहाजांकडून टोल वसुली सुरू केली पाहिजे, असा सल्ला दिला आहे.
युद्धानंतर इराणने होर्मुझमधून टोल वसुली करण्याच्या सुरू केलेल्या तयारीबाबत अजय बग्गा यांनी नाराजी व्यक्त केली आहे. तसेच हे लोण आता जगभरात पसरेल अशी भीती त्यांनी व्यक्त केली आहे. अजय बग्गा यांनी सांगितले की, इराणला होर्मुझमधून टोल वसूल करण्याची सवलत मिळाली तर ही बाब जगासाठी धोकादायक ठरेल. त्यानंतर सिंगापूर मलाक्काच्या सामुद्रधुनीतून आणि तुर्कीए बोस्फोर येथे टोल लावू शकतात. या पार्श्वभूमीवर भारतानेही अंदमान आणि निकोबारच्या दक्षिणेला नौदलाची तैनाती करत येथील समुद्रातून जाणाऱ्या सर्व जहाजांवर टोल आकारण्यास सुरुवात केली पाहिजे.
अजय बग्गा यांनी ज्या अंदमान जवळ टोल लावण्याचा सल्ला दिला आहे तो भाग अंदमान निकोबार बेटांच्या समुहामधील ग्रेट निकोबार बेटावर असलेल्या इंदिरा पॉईंट जवळ आहे. हा भाग भारताच्या दक्षिणेचं शेवटचं टोक आहे. त्याच्या दुसऱ्या बाजूला इंडोनेशियाचं सबांग हे ठिकाण आहे. या भागातील लांबी केवळ १४५ किमी एवढी आहे. तसेच यातून जगातील इतर भागातून आग्नेय आशियापासून चीनपर्यंत जाणाऱ्या मालाची वाहतूक होते.
