लेबनानवर केलेल्या प्राणघातक हवाई हल्ल्यांमध्ये शेकडो नागरिकांचा मृत्यू झाल्यानंतर आता इस्रायलने लेबनानबरोबर शांतता चर्चा करण्याची तयारी दर्शवली आहे.
इस्रायलचे पंतप्रधान बिन्यामिन नेतान्याहू यांनी सरकारी प्रतिनिधींना लेबनानबरोबर शांतता चर्चा सुरु करण्याचे निर्देश दिले आहेत. रॉयटर्सच्या वृत्तानुसार, बुधवारी इस्रायलने लेबनानवर केलेल्या जवळपास १०० हवाई हल्ल्यांमध्ये २५० नागरिकांचा मृत्यू झाला होता. इराणबरोबर झालेल्या शस्त्रसंधीनंतर इस्रायलने केलेल्या या हल्ल्यांवरुन इराणने प्रश्न उपस्थित केले होते.
लेबनानबरोबर चर्चा सुरु करण्याचे निर्देश
इस्रायलचे पंतप्रधान बिन्यामिन नेतान्याहू यांनी आपल्या सरकारला लेबनानबरोबर शांतता चर्चा सुरू करण्याचे निर्देश दिले आहेत. बीरूतकडून वारंवार संपर्क साधण्याच्या प्रयत्न केला जात होता, त्याला प्रसिसाद म्हणून चर्चेचे पाऊल उचलण्यात आल्याचे नेतान्याहू यांनी म्हटले आहे. इराणबरोबर शस्त्रसंधीची घोषणा केल्यानंतर यात लेबनानचा देखील समावेश असल्याचे इराण आणि पाकिस्तानने देखील म्हटले होते. पण, इस्रायलकडून हा दावा फेटाळण्यात आला व लेबनानवर हल्ले सुरुच ठेवण्यात आले. या हल्ल्यांमध्ये आत्तापर्यंत शेकडो नागरिकांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे.
बिन्यामिन नेतान्याहू नक्की काय म्हणाले?
‘लेबनानकडून चर्चेसाठी वारंवार विनंती करण्यात येत आहे, या विनंतीचा विचार करुन मी माझ्या सरकारला लेबनानबरोबर लवकरात लवकर थेट चर्चा सुरु करण्याचे निर्देश दिले आहेत. वाटाघाटी प्रामुख्याने हेझबोल्लाहला निःशस्त्र करणे आणि इस्रायल आणि लेबनान यांच्यात शांततापूर्ण संबंध प्रस्थापित करणे यावर भर दिला जाईल. लेबनानच्या पंतप्रधानांनी बीरूतचे निःशस्त्रीकरण करण्याबाबत केलेल्या आवाहनाचे इस्रायल कौतुक करतो’, असे नेतान्याहू यांनी एक्सवर केलेल्या पोस्टमध्ये म्हटले आहे.
लेबनानचे अध्यक्षांची चर्चेची भूमिका
नेतान्याहू यांच्या घोषणेच्या अगदी काही वेळ अगोदर, लेबनानचे अध्यक्ष जोसेफ औन यांनी युद्धविरामावर भाष्य केले होते. ‘हिंसाचार थांबत नाही तोपर्यंत गोष्ट पुढे जाणार नाहीत आणि कोणत्याही गंभीर चर्चेसाठी युद्धविराम हाच मूलभूत उपाय आहे’, असे जोसेफ औन यांनी स्पष्ट केले होते. संघर्षावर तोडगा काढण्यासाठी थेट संवाद करण्याशिवाय दुसरा पर्याय नाही असेही मत त्यांनी मांडले होते. यासाठी इस्रायसोबत संवाद साधून चर्चेला त्यांना तयार करण्याचे प्रयत्न सुरु असल्याचे औन यांनी म्हटले होते.
हजारो नागरिकांचा मृत्यू, हजारो जखमी
इस्रायलने लेबनानवर सुरु हल्ले सुरु केल्यापासून १,७०० नागरिकांचा मृत्यू झाल्याचा दावा करण्यात आला आहे. हजारो लोक जखमी झाले आहेत तर लाखो नागरिकांनी घर सोडून स्थलांतर केले आहे. बुधवारी इस्रायलने लेबनानवर केलेल्या १०० हून अधिक हल्ल्यांमध्ये २५० नागरिकांचा मृत्यू झाला होता. तसेच, इस्रायली हल्ल्यांमध्ये ४०० हेझबोल्लाचे बंडखोर ठार झाल्याचे स्थानिक वृत्तपत्रांनी म्हटले आहे.
