राष्ट्रवादी काँग्रेसचे (अजित पवार गट) नेते व नवनियुक्त खासदार पार्थ पवार यांनी गुरुवारी राज्यसभेच्या सदस्यत्वाची शपथ घेतली. त्यामुळे निदान महिनाभरासाठी तरी पवार कुटुंबातील तीन सदस्य वरिष्ठ सभागृहाचे खासदार असतील.
शरद पवार यांनी गेल्या आठवड्यामध्ये राज्यसभेची शपथ घेतली होती, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार अजूनही या सभागृहाच्या सदस्य आहेत. बारामतीच्या पोटनिवडणुकीत ४ मे रोजी विजयी झाल्या तर त्या विधानसभेच्या सदस्य होतील, त्यानंतर त्यांची राज्यसभेतील खासदारकी संपुष्टात येईल.
‘काँग्रेसची पडझड होईल’, असे विधान करून वाद ओढवून घेणारे पार्थ पवार यांनी गुरुवारी उपराष्ट्रपती व राज्यसभेचे सभापती सी. पी. राधाकृष्णन यांच्या संसदेतील दालनामध्ये इंग्रजीतून सदस्यत्वाची शपथ घेतली. या वेळी त्यांनी वडील दिवंगत अजित पवार यांचे गुलाबी रंगाचे जाकीट घातले होते. शपथविधीवेळी पार्थ यांच्याबरोबर सुनेत्रा पवार तसेच खासदार प्रफुल पटेल व सुनील तटकरे हे दोघेही उपस्थित होते. सुनेत्रा पवार यांनी बारामती मतदारसंघातील पोटनिवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरतानाही हे दोघे नेते उपस्थित राहिले होते.
संसदेमध्ये गुरुवारी पटेल व तटकरे हजर राहिल्याने दिल्लीत पक्षनेत्यांच्या एकजुटीचे चित्र निर्माण झाले होते. गेल्या वेळी सुनेत्रा पवार संसदेत आल्या तेव्हा पटेल व तटकरे हे दोन नेते गैरहजर होते, त्यावरून राजकीय वाद रंगला होता. या वेळी मात्र दोघेही संसदेत आले, शिवाय शपथविधी सोहळ्यानंतर पार्थ व सुनेत्रा पवार, पटेल व पक्षाचे दिल्लीत आलेले आमदार-नेते तटकरेंच्या निवासस्थानी गेले होते. पार्थ पवार यांनी राज्यसभेतील सदस्यत्वाची शपथ घेतल्यानंतर दिल्लीत कोणतीही जाहीर टिप्पणी केली नाही. राज्यसभेचे खासदार म्हणून जनतेच्या अपेक्षा पूर्ण करण्याचा व विकासाभिमुख राजकारण करण्याचा निर्धार पार्थ पवार यांनी व्यक्त केल्याचे पक्षाच्या वतीने सांगण्यात आले.
आम्ही दिल्लीत प्रयत्न केले : तटकरे
* सुनेत्रा पवार यांच्याविरोधातील उमेदवारी मागे घेण्याबाबत राष्ट्रवादी काँग्रेसच्या (अजित पवार गट) नेत्यांनी प्रयत्न केले नसल्याचे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांचे आरोप ‘राष्ट्रवादी’चे खासदार सुनील तटकरे यांनी फेटाळले. * मी व प्रफुल पटेल यांनी दिल्लीतील काँग्रेस नेत्यांशी वारंवार संपर्क करण्याचा प्रयत्न केला. केरळमध्ये असलेले मल्लिकार्जुन खरगे यांना मी ५-६ वेळा फोन केला होता पण संवाद होऊ शकला नाही. काँग्रेसला कदाचित शेवटच्या क्षणापर्यंत वाट पाहायची असावी, अशी टिप्पणी त्यांनी केली. ४ मे रोजी निकाल लागल्यानंतर सगळ्या मुद्द्यांवर मी बोलेन, असेही तटकरे म्हणाले.
