मल्लिकार्जुन खर्गेंच्या अपमानावरून हिमांता बिस्वा सरमांविरुद्ध ‘जोडे मारो’ आंदोलन…
आसामचे मुख्यमंत्री हिमांता बिस्वा सरमा यांनी काँग्रेस अध्यक्ष आणि देशातील ज्येष्ठ बहुजन नेते मल्लिकार्जुन खर्गे यांच्याबद्दल केलेल्या आक्षेपार्ह वक्तव्याचे पडसाद आता संपूर्ण राज्यात उमटत आहेत.
या विधानाचा निषेध करण्यासाठी महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेस आणि नागपूर शहर युवक काँग्रेसच्या वतीने आज देवडिया काँग्रेस भवन येथे ‘उग्र’ आंदोलन करण्यात आले.
आक्रमक घोषणांनी परिसर दणाणला
दलितांचा अपमान करणाऱ्यांचा निषेध असो, “भाजपचा मनुवाद हद्दपार करा” आणि संविधानावर हल्ला सहन करणार नाही अशा आक्रमक घोषणा देत युवक काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी परिसर डोक्यावर घेतला होता. संतप्त कार्यकर्त्यांनी सरमा यांच्या प्रतिमेला जोडे मारले आणि त्यांच्या पुतळ्याचे दहन करण्याचा प्रयत्न करून आपला तीव्र रोष व्यक्त केला.
पोलिसांची धरपकड, तरीही कार्यकर्त्यांचा निर्धार कायम
आंदोलना दरम्यान परिस्थिती तणावपूर्ण झाल्याने पोलिसांनी हस्तक्षेप करत अनेक पदाधिकारी व कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले. मात्र, पोलिसांच्या या कारवाईमुळे कार्यकर्त्यांचा उत्साह कमी न होता रोष अधिकच वाढलेला पाहायला मिळाला. युवक काँग्रेसने स्पष्ट इशारा दिला आहे की, हा केवळ राजकीय विरोध नसून बहुजन समाजाच्या अस्मितेचा लढा आहे.
नेतृत्वाचा घणाघात
या आंदोलनाचे नेतृत्व भारतीय युवक काँग्रेसचे सचिव व महाराष्ट्राचे सह-प्रभारी नवज्योत सिंग संधू यांनी केले. यावेळी ते म्हणाले की, “हिमांता बिस्वा सरमा यांचे वक्तव्य हे त्यांच्या विकृत आणि अहंकारी मानसिकतेचे प्रतीक आहे. भ्रष्टाचाराच्या मुद्द्यांवरून लक्ष भरकटवण्यासाठी भाजप जाणीवपूर्वक बहुजन समाजाचा आणि ज्येष्ठ नेत्यांचा अपमान करत आहे. अशा प्रवृत्तींना रस्तावर उतरून चोख प्रत्युत्तर दिले जाईल.
लोकशाहीचा गळा घोटण्याचे कारस्थान?
युवक काँग्रेसने यावेळी काँग्रेस प्रवक्ते पवन खेरा यांच्यावर झालेल्या कारवाईचाही तीव्र निषेध केला. विरोधकांचा आवाज दडपण्यासाठी सत्तेचा गैरवापर केला जात आहे, हा लोकशाहीचा गळा घोटण्याचा प्रकार आहे, असा गंभीर आरोप यावेळी करण्यात आला.
यांची होती प्रमुख उपस्थिती
आंदोलनात नागपूर झोन इन्चार्ज कपिल ढोके, उपाध्यक्ष तनवीर विद्रोही, अनुराग भोयर, नागपूर प्रभारी रितेश पांडव, महासचिव अक्षय हेटे यांच्यासहमोठ्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित होते. येणाऱ्या काळात हे आंदोलन अधिक तीव्र आणि व्यापक केले जाईल, असा निर्णायक इशारा यावेळी युवक काँग्रेसकडून देण्यात आला आहे.
