शंभूराज देसाईंसमोरच शिंदेंना सांगितलं होतं, तुम्हाला चुकीचं ब्रीफिंग…
सातारा जिल्हा परिषद अध्यक्ष-उपाध्यक्ष निवडीचे कवित्व पंधरा दिवसांनंतरही संपायला तयार नाही. राष्ट्रवादी जिल्हा परिषद सदस्यांना मतदान करू न देता अटक करणे आणि त्यावेळी पालकमंत्री शंभूराज देसाई यांना झालेली धक्काबुक्की राज्यात गाजली होती.
त्यासंदर्भात शिवसेनेचे आमदार महेश शिंदे यांनी ‘साताऱ्यातील परिस्थिती तुम्हाला वाटते तशी नाही, तुम्हाला कोणीतरी चुकीचं ब्रीफिंग केलं आहे, हे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पालकमंत्री शंभूराज देसाई यांच्यासमोर सांगितलं होतं, असा गौप्यस्फोट केला.
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे आजपासून तीन दिवस सातारा जिल्ह्यातील त्यांच्या दरे गावी मुक्कामी असणार आहेत. त्यापूर्वीच पत्रकार परिषद घेऊन शिवसेना आमदार महेश शिंदे यांनी आपली भूमिका स्पष्ट केली आहे.
आमदार शिंदे म्हणाले, जिल्हा परिषद (Zilla Parishad) अध्यक्ष-उपाध्यक्ष निवडीच्या सात दिवस अगोदर पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी मला बोलावून घेतलं होतं. पालकमंत्री देसाई यांच्यासमोर मी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना सांगितलं होतं. ‘साहेब, तुम्हाला वाटतं तशी परिस्थिती नाही. निवडून आलेल्या जिल्हा परिषद सदस्यांच्या भावना या महायुतीसोबतच्या आहेत, त्या महाविकास आघाडीच्या सोबतच्या नाहीत. तुम्हाला चुकीचं ब्रीफिंग दिलं जातंय. हे मी पालकमंत्र्यांसमोर उपमुख्यमंत्री शिंदेंना सांगितलं होतं.
जिल्हा परिषद अध्यक्ष-उपाध्यक्षपदाच्या निवडणुकीत घेतलेल्या भूमिकेसंदर्भात मी कोणालाही अंधारात ठेवलेले नाही. पहिल्या दिवसापासून माझी भूमिका स्पष्ट होती. आमची युती निवडणुकीपूर्वी राष्ट्रवादीसोबत असती, तर आम्ही त्याच युतीसोबत राहिलो असतो. पण. ते महाविकास आघाडीसोबत गेले नसते तर… असेही आमदार शिंदे यांनी स्पष्ट केले.
कुणबी-ओबीसी दाखल्यासाठी १५ दिवस अगोदर अर्ज केला होता
महेश शिंदे म्हणाले, पंधरा दिवस आधी एका गोष्टीसाठी कुणबी ओबीसी दाखल्यासाठी अर्ज करून ठेवला होता. आदल्या दिवसापर्यंत आम्हालाही माहिती नव्हतं की, आमची उमेदवारी होईल. आम्ही महायुती म्हणूनच भाजपसोबत गेलो. बॅकअपला म्हणून आम्हाला ओबीसी कुणबी दाखला काढून ठेवा, असे आदेश आले होते.
