सोन्याची तस्करी पाहून अधिकारीही चक्रावले !
मुंबई: मुंबईच्या छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर महसूल गुप्तचर संचालनालयाने (DRI) ऑपरेशन धहाबू ब्लिट्झ अंतर्गत मोठी कारवाई केली आहे. नैरोबीहून आलेल्या 24 परदेशी महिलांना अटक करण्यात आली असून, त्यांच्याकडून तब्बल 29.37 किलो सोने जप्त करण्यात आले आहे.
आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत या सोन्याची किंमत सुमारे 37.74 कोटी रुपये आहे.
DRI च्या मुंबई पथकाला ८ एप्रिल २०२६ रोजी एका मोठ्या तस्करीच्या रॅकेटची गोपनीय माहिती मिळाली. नैरोबीहून मुंबईत येणाऱ्या काही प्रवाशांवर संशय व्यक्त करण्यात आला होता. या माहितीच्या आधारे विमानतळावर सापळा रचण्यात आला. संशयास्पद वाटणाऱ्या २४ परदेशी महिलांना अडवून त्यांची कसून तपासणी केली असता, सोन्याची तस्करी उघड झाली.
तपासणी दरम्यान, या महिलांकडे सोन्याची बिस्किटे आणि दागिने सापडले.२५.१० किलो सोन्याची बिस्कीटं आणि ४.२७ किलो सोन्याचे दागिने जप्त करण्यात आले. विशेष म्हणजे, ही तस्करी करण्यासाठी या महिलांना विशेष प्रशिक्षण देण्यात आलं होतं. अत्यंत नियोजनबद्ध पद्धतीनं नेटवर्कच्या माध्यमातून हे रॅकेट चालू होतं.
या कारवाईमुळे तस्करीचे एक मोठे आंतरराष्ट्रीय नेटवर्क उघड झाले आहे. देशाच्या आर्थिक आणि वित्तीय व्यवस्थेला धोका निर्माण करणाऱ्या अशा रॅकेट्सवर DRI ने हा मोठा आघात केला आहे. या तस्करी मागे नेमके कोण मास्टरमाईंड आहेत आणि हे सोनं मुंबईत कोणाकडे जाणार होतं, याचा तपास आता DRI चे अधिकारी करत आहेत.
