‘एचआर’ निघाली प्रेग्नंट; फरार निदा खान मुंबईत…
टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस अर्थात टीसीएम मधील सक्तीचे धर्मांतरण आणि लैंगिक छळाच्या गंभीर आरोपांनंतर फरार असलेली आरोपी निदा खान मुंबईमध्ये असल्याचं मीडिया रिपोर्टनुसार सांगण्यात येतंय.
विशेष म्हणजे तिने वैद्यकीय कारणास्तव न्यायालयाकडे जामीन मागितलेला आहे. निदा खान ही गर्भवती असल्याची बाब पुढे येत आहे.
नाशिक आयटी कंपनीतील धर्मांतर प्रकरणात पोलिसांनी स्थापन केलेले विशेष तपास पथक या प्रकरणाचा कसून तपास करत आहे. आतापर्यंत याप्रकरणी सात कर्मचाऱ्यांना अटक करण्यात आली आहे, ज्यात सहा पुरुष आणि एचआर हेड अश्विनी चैननी यांचा समावेश आहे.
कंपनीतील वरिष्ठ सहकाऱ्यांनी १८ ते २५ वयोगटातील महिला कर्मचाऱ्यांचे मानसिक आणि लैंगिक शोषण केल्याचा आरोप आहे. तक्रारदार महिलांनी जेव्हा याबद्दल वरिष्ठांकडे तक्रार केली, तेव्हा त्यांच्या तक्रारींकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करण्यात आले. निदा खान हिने तक्रारदार महिलेला “अशा गोष्टी तर होतच असतात” असे म्हणून गप्प राहण्यास सांगितल्याचा आरोप आहे.
तक्रारदारांच्या म्हणण्यानुसार, आरोपींचा एक गट कंपनीत सक्रिय होता. त्यांनी एका पुरुष कर्मचाऱ्याला नमाज पठण करण्यास भाग पाडले आणि हिंदू देवी-देवतांचा अपमान केला. याशिवाय कर्मचाऱ्यांना जबरदस्तीने मांसाहारी जेवण खाऊ घालणे आणि विशिष्ट धार्मिक रीतीरिवाजांचे पालन करण्यास भाग पाडणे असे गंभीर आरोपही तक्रारीत करण्यात आले आहेत.
कंपनीचं म्हणणं काय आहे?
टीसीएस कंपनीने अधिकृत निवेदन प्रसिद्ध केले आहे. त्यात म्हटलंय की, कंपनीचे कोणत्याही प्रकारच्या छळवणुकीबाबत ‘झिरो टॉलरन्स’ धोरण आहे. नाशिकमधील घटनेची माहिती मिळताच आम्ही तात्काळ कारवाई केली असून, संबंधित कर्मचाऱ्यांना तपासापर्यंत निलंबित केले आहे. आम्ही पोलीस तपासात पूर्ण सहकार्य करत आहोत, असे कंपनीने स्पष्ट केले आहे.
नाशिक पोलिसांकडून आतापर्यंत ९ एफआयआर दाखल करण्यात आले असून निदा खान हिच्या जामीन अर्जावर न्यायालय काय निर्णय घेते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. तिने कोर्टाकडे प्रेग्नंट असल्याचं कारण दिल्याची माहिती आहे.
