होर्मुझच्या ‘पतली गली’ ने देशांचे प्राण कंठाशी आणले…
आंतरराष्ट्रीय सागरी कायद्याचे नियमन करणाऱ्या संयुक्त राष्ट्र सागरी कायदा अधिवेशन म्हणजे UNCLOS नुसार, सामुद्रधुनींना लागून असलेल्या देशांना केवळ त्यातून वाट देण्यासाठी कोणत्याही प्रकारच्या शुल्काची मागणी करता येत नाही.
इराण होर्मुझ सामुद्रधुनीतून जाणाऱ्या जहाजांवर मोठा टोल आकारण्याचा प्रयत्न करत असल्याचे अनेक अहवाल आतापर्यंत समोर आले आहेत. काही जहाजांना लाखो डॉलर्स देण्यास सांगितले जात असून केवळ निवडक जहाजांनाच वाट दिली जात आहे. अशा दाव्यांची स्वतंत्रपणे पडताळणी करणे सोपं नसलं तरीही यामुळे एक महत्त्वाचा प्रश्न निर्माण होतो: कोणत्याही सागरी मार्गावर टोल आकारला जाऊ शकतो का?
होर्मुझ सामुद्रधुनीतून जाणाऱ्यांवर टोल आकारला जाऊ शकतो का?
होर्मुझ सामुद्रधुनी एक नैसर्गिक मार्ग आणि आंतरराष्ट्रीय सागरी मार्गाचा भाग आहे. होर्मुझच्या सामुद्रधुनीचा काही हिस्सा ओमानच्या अधिकाराखाली येतो तर काही प्रमाणात इराणचेही येथे नियंत्रण आहे. अशा परिस्थितीत, आंतरराष्ट्रीय सागरी कायदा, विशेषतः संयुक्त राष्ट्र सागरी कायदा करार (UNCLOS), अशा सामुद्रधुनीसाठी स्पष्ट नियम निश्चित करतो. याअंतर्गत कोणत्याही देशातील जहाजांना या मार्गातून कोणत्याही अडथळ्याशिवाय जाण्याची परवानगी आहे.
ओमानने आधीचअशा मार्गांवर कोणतेही शुल्क आकारण्यास मनाई करणाऱ्या सर्व आंतरराष्ट्रीय करारांवर स्वाक्षरी केल्याचं स्पष्ट केलं आहे. त्यामुळे होर्मुझ सामुद्रधुनीसारख्या नैसर्गिक सागरी मार्गांवर टोल आकारणे आंतरराष्ट्रीय कायद्या विरोधात मानले जाते. होर्मुझ सामुद्रधुनी एक नैसर्गिक सागरी मार्ग असल्याचं ओमानने म्हटले आहे.
नैसर्गिक मार्गांवर टोल आकारला जाऊ शकत नाही पण, जगातील कोणत्या सागरी मार्गांवर जहाजांना शुल्क भरावे लागते? याचे उत्तर आहे मानवनिर्मित कालवे. जगात दोन सर्वात महत्त्वाचे कालवे – सुएझ कालवा आणि पनामा कालवा – ही दोन उदाहरणे आहेत जिथं जहाजांना पारगमन शुल्क आकारले जाते.
आशिया आणि युरोपला जोडणारा दुवा – सुएझ कालवा इजिप्तमध्ये असून भूमध्य समुद्राला लाल समुद्राशी जोडतो. सुएझ कालवा आशिया आणि युरोप दरम्यानचा सर्वात लहान सागरी मार्ग मानला जातो. इजिप्तची सरकारी संस्था – सुएझ कालवा प्राधिकरणाद्वारे – या कालव्याचे संचालन केले जाते. हा इजिप्तच्या अर्थव्यवस्थेसाठी महसुलाचा एक प्रमुख स्रोत असून जहाजाचा आकार, वजन आणि मालावर शुल्क आकारले जाते. मोठ्या कंटेनर जहाजांना येथून जाण्यासाठी 500,000 ते 700,000 डॉलर्स द्यावे लागतात, तर तेलवाहू जहाजे 300,000 ते 600,000 डॉलर्स शुल्क द्यावे लागू शकते.
मध्य अमेरिकेत स्थित पनामा कालवा अटलांटिक महासागराला पॅसिफिक महासागराशी जोडतो. पनामा कालवा प्राधिकरण याचे संचालन करते आणि जहाजाचा आकार, क्षमता आणि ज्या प्रकारच्या जलद्वारांमधून (लॉक) जाते, अशा अनेक घटकांच्या आधारावर टोल आकारला जातो, जे साधारणपणे $100,000 ते $450,000 दरम्यान असू शकते. या कालव्याद्वारे प्रामुख्याने धान्य, कोळसा, कंटेनरमधील माल आणि पेट्रोलियम उत्पादनांची वाहतूक केली जाते.
होर्मुझ, सुएझ आणि पनामा या जलमार्गांमधील सर्वात महत्त्वाचा फरक म्हणजे की होर्मुझ नैसर्गिक सागरी मार्ग आहेत, तर सुएझ आणि पनामा मानवनिर्मित कालवे आहेत. नैसर्गिक मार्ग आंतरराष्ट्रीय कायद्याद्वारे नियंत्रित केले जातात, ज्यामुळे येथून मुक्त जलवाहतुक अपेक्षित आहे. याउलट कृत्रिम कालवे संबंधित देशांद्वारे चालवले जातात, ज्यामुळे त्यातून जाणाऱ्या जहाजांकडून शुल्क आकारण्याची मुभा मिळते.
