वैभव सूर्यवंशीबाबत गावस्करांनी सर्व IPL संघांना कोणता इशारा दिला?
मुंबई : आयपीएलमधील आपल्या धडाकेबाज फलंदाजीने १५ वर्षीय वैभव सूर्यवंशीने संपूर्ण क्रिकेट विश्वाला थक्क केले आहे.
मंगळवारी पंजाब किंग्सविरुद्ध राजस्थान रॉयल्सकडून खेळताना सूर्यवंशीने अवघ्या १६ चेंडूत ४३ धावांची वादळी खेळी केली. यासह आयपीएल २०२६ मध्ये ४०० धावांचा टप्पा पार करणारा तो पहिला फलंदाज ठरला आहे. सूर्यवंशीच्या या खेळीत ५ षटकार आणि ३ चौकारांचा समावेश होता. भारताचे माजी कर्णधार सुनील गावस्कर सूर्यवंशीच्या खेळी प्रचंड प्रभावित झाले आहेत. त्यांनी वैभव सूर्यवंशीच्या खेळीचे कौतूक करताना सर्व आयपीएल संघाना इशारा देत मोठे भविष्य वर्तवले आहे.
“त्याला थांबवणे अशक्य!”
भारताचे माजी कर्णधार सुनील गावस्कर सूर्यवंशीच्या फटक्यांनी प्रचंड प्रभावित झाले आहेत. गावस्करांच्या मते, या १५ वर्षांच्या मुलाला रोखणे आता जवळपास अशक्य झाले असून, सीमारेषेवर १० क्षेत्ररक्षक उभे केले तरी त्याला रोखता येणार नाही. गावस्करांचे हे विधान इतर आयपीएल संघांसाठी धोक्याची घंटा मानली जात आहे.
सीमारेषेवर १० क्षेत्ररक्षक असले तरी….
स्टार स्पोर्ट्सवर बोलताना गावस्कर म्हणाले, “त्याने मारलेले फटके अप्रतिम होते. सीमारेषेवर १० क्षेत्ररक्षक असले तरी ते त्याला रोखण्यासाठी पुरेसे ठरले नसते. तो कोणत्याही दडपणाखाली दिसत नाही. मला वाटते इतक्या लहान वयात खेळण्याचा हाच फायदा आहे. तुम्हाला कशाचीही चिंता नसते आणि तुम्ही समोरच्या प्रतिस्पर्ध्याकडे लक्ष देत नाही, फक्त आपला खेळ करता.
सामन्यात काय घडलं?
मंगळवारी चंदीगड येथील महाराजा यादविंद्र सिंग आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर पार पडलेल्या ४० व्या सामन्यात, डोनोव्हन फरेरा आणि शुभम दुबे यांनी अवघ्या ३२ चेंडूत ७७ धावांची नाबाद भागीदारी करत राजस्थान रॉयल्सला पंजाब किंग्सवर ६ गडी राखून थरारक विजय मिळवून दिला. १४ षटकांनंतर सामना अटीतटीच्या स्थितीत होता आणि विजयासाठी १२ पेक्षा जास्त धावगतीची (Run Rate) गरज होती. मात्र, फरेरा आणि दुबे जोडीने हे लक्ष्य सोपे केले. फिरकीपटूंची षटके संपल्यानंतर या जोडीने वेगवान गोलंदाजांवर हल्ला चढवला. अर्शदीप सिंगच्या षटकात तीन चौकार आले, तर मार्को जानसेनच्या षटकात एक चौकार आणि एक षटकार ठोकला गेला. अर्शदीपविरुद्ध आक्रमक खेळ सुरू ठेवत या जोडीने पंजाब किंग्सला या हंगामातील पहिला पराभव चाखायला लावला.
वैभवच्या नावावर अनोखा विक्रमाची नोंद
राजस्थान समोर असणार्या आव्हानाचा पाठलाग करताना १५ वर्षीय वैभव सूर्यवंशीने दमदार सुरुवात करून दिली. वैभवने पहिल्याच षटकात राजस्थानला १५ धावा मिळवून दिल्या. त्यानंतर त्याने लॉकी फर्ग्युसन आणि जानसेन यांच्यावरही हल्ला चढवला. वैभवने १६ चेंडूत ४३ धावा केल्या. अर्शदीपने अँगल बदलून टाकलेल्या लो फुल टॉसवर मोठा फटका मारण्याच्या नादात तो बाद झाला. त्याचा स्ट्राइक रेट २३८.०९ इतका थक्क करणारा होता. आयपीएलच्या एका हंगामात कोणत्याही खेळाडूने केलेल्या सर्वात वेगवान ४०० धावांचा विक्रम आहे. वैभवच्या खेळीमुळे राजस्थानने ३.२ षटकांत ५० धावा पूर्ण केल्या. वैभव बाद झाल्यानंतर जैस्वालने सूत्रे हाती घेत २७ चेंडूत ५१ धावांची खेळी केली. मात्र, युझवेंद्र चहलने जैस्वाल आणि रियान पराग (२९) यांना बाद करून पंजाबला सामन्यात परत आणण्याचा प्रयत्न केला होता. अखेर फरेरा आणि दुबे यांच्या फटकेबाजीमुळे राजस्थानने विजय साकारला.
