भाजप नेत्याचा खरमरीत सवाल !
मीरा रोड येथे धर्म विचारून सुरक्षारक्षकावर चाकूहल्ला झाल्याची घटना घडली. या प्रकरणात झैब झुबेर याला ताब्यात घेण्यात आले आहे. या मुद्द्यावरून उद्धवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी काही विधाने केली होती.
त्यावर आता भाजपकडून प्रत्युत्तर देण्यात आले आहे. मीरा रोड येथे धर्म विचारून सुरक्षारक्षकाला झालेल्या मारहाणीबाबत बोलताना जनाब संजय राऊत यांनी ‘धर्म विचारून मारहाण तर वेगवेगळ्या धर्मांमध्ये केली जाते’ असे धक्कादायक विधान केले. संजय राऊत, अशी मुक्ताफळे उधळताना तुम्हाला लाज वाटली नाही का? असे वादग्रस्त विधान करून तुम्ही हिंदूंची बदनामी करत आहात. आजवर कुठल्या हिंदूंनी धर्म विचारून अन्य धर्मीयांवर हल्ले केले याचे एकतरी उदाहरण द्याल का?” असा खरमरीत सवाल भाजपा प्रदेश मुख्य प्रवक्ते नवनाथ बन यांनी बुधवारी केला.
संजय राऊत, दाढ्या कुरवाळता याव्यात आणि आपली मते सुरक्षित रहावीत यासाठी तुम्ही हिंदूंची, हिंदू धर्माची बदनामी करण्याचा प्रयत्न करत आहात. परंतु एक लक्षात ठेवा, हिंदू हा सर्वात सहिष्णु धर्म आहे. आजपर्यंत हिंदू धर्माच्या कुठल्याही व्यक्तीने कुठल्याही व्यक्तीला धर्म विचारून मारहाण केलेली नाही. मात्र पहलगाम येथे धर्म विचारून महिलांसमोर त्यांच्या नवऱ्यांना गोळ्या घातल्या गेल्या. मिरा रोड येथे धर्म विचारून सुरक्षारक्षकाला मारहाण होते. दुर्दैवाने तुमची ही जनाबी प्रवृत्ती नेमकी कशासाठी सुरू आहे याचे उत्तर एकदा महाराष्ट्राला द्या. औरंगजेबाच्या पिल्लावळीला खुश करण्यासाठी अशा पद्धतीची वादग्रस्त विधाने करत असाल तर लक्षात घ्या, हा छत्रपती शिवाजी महाराजांचा महाराष्ट्र आहे. इथे औरंगजेबाचा उदो-उदो चालणार नाही तर छत्रपती शिवाजी महाराजांचा जयजयकार होईल,असे बन यांनी ठणकावले.
अडीच लाखांच्या फौजेच्या बळावर निवडणूक जिंकता येत नाही, हे संजय राऊत विसरलेत का? ममता बॅनर्जींचा एवढाच पुळका होता तर तुम्ही पश्चिम बंगालमध्ये जाऊन त्यांचा प्रचार का केला नाही? उद्धव ठाकरे मातोश्रीवर का बसून राहिले? ममता बॅनर्जींनी उद्धवजींना बोलावले नाही की उद्धवजींना ममता बॅनर्जी यांच्याकडे जाण्यासाठी वेळ नव्हता? ममता बॅनर्जी यांच्यासाठी तुम्हा दोघांची एक-एक सभा झाली असती तर भाजपाच्या अजून दहा जागा वाढल्या असत्या. पश्चिम बंगालमध्ये ममता बॅनर्जी यांच्या दहशतीला जनता कंटाळली होती. ही दहशत झुगारून पश्चिम बंगालमध्ये पहिल्या टप्प्यात ९५ टक्के मतदान झाले. त्यामुळे येत्या चार मे रोजी भाजपाचे कमळ पश्चिम बंगालमध्ये फुलेलेले दिसेल,असा विश्वास बन यांनी व्यक्त केला.
भाजपा सातत्याने सबका साथ, सबका विकास आणि सबका विश्वास या मंत्रावर अवलंबून आहे. जेव्हा जेव्हा विधान परिषद, राज्यसभा निवडणूक येते तेव्हा सर्व समाजघटकांना संधी मिळाली पाहिजे असा भाजपाचा प्रयत्न असतो. तळागाळात काम करणाऱ्या, वर्षानुवर्षे भाजपाचा झेंडा खांद्यावर घेऊन पक्ष वाढवण्याचा प्रयत्न करतात अशा सगळ्यांना सामावून घेण्याचा प्रयत्न भाजपाने सातत्याने केला. याही विधान परिषदेच्या यादीवर नजर टाकली तर ते लक्षात येईल, असे ते म्हणाले.
