मस्सोजगच्या सरंपच पदाच्या पोटनिवडणुकीत अश्विनी देशमुख यांना पराभूत करून विजयी झाल्यानंतर नवनिर्वाचित सरपंच स्वरुपानंद देशमुख यांनी थेट दिवगंत संतोष देशमुख यांचे घर गाठले.
निवडणुकीतील विजयाच्या जल्लोषात संतोष देशमुख यांच्या बलिदानाची आठवण ठेवत त्यांनी त्यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करत कुटुंबियांशीही संवाद साधला.
पोटनिवडणुकीच्या प्रचारात स्वरुपानंद देशमुख यांनी संतोष देशमुख व त्यांच्या कुटुंबियांच्या न्यायालयीन लढ्यात आपण त्यांच्यासोबत असल्याची ग्वाही दिली होती. अश्विनी देशमुख यांना निवडणूक लढवण्याची इच्छा नसताना त्यांना निवडणुकीत उतरवलं. त्यांच्या आडून राजकारण करू पाहणाऱ्यांना गावातील मतदारांनी धडा शिकवला, अशी प्रतिक्रिया विजयानंतर स्वरुपानंद यांनी दिली होती.
विजयाचा जल्लोष झाल्यानंतर स्वरुपानंद देशमुख यांनी थेट दिवंगत संतोष देशमुख यांचे घर गाठले. तिथे त्यांनी संतोष देशमुख यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करत अभिवादन केले. अश्विनी देशमुख यांच्यासह संतोष देशमुख यांच्या आईचेही आशीर्वाद घेतले. मी अगोदरही संतोष देशमुखांसाठीच्या न्यायासाठीच्या लढाईत पुढे होतो, इथून पुढेही या लढाईत मी असेन, अशी ग्वाही त्यांनी दिली.
निवडणूक प्रचारात स्वरुपानंद देशमुख यांनी देशमुख कुटुंबावर टीका केली होती. साडे तेरा वर्ष तुमची सत्ता होती, त्या काळात अशी कोणती कामे अपूर्ण राहिली, जी तुम्ही पुढच्या अठरा महिन्यात करणार आहात? हे समोरासमोर येऊन सांगा, असे आव्हान त्यांनी विरोधकांना दिले होते. मात्र निवडणूक पार पडली, आता आपल्या मनात कुठलीही वाईट भावना नाही. सगळ्यांना सोबत घेऊन गावाचा विकास करणार असल्याचे स्वरुपानंद देशमुख यांनी म्हटले आहे.
दरम्यान, मागील निवडणुकीत स्वरुपानंद देशमुख यांचा केवळ ९ मतांनी पराभव झाला होता. यावेळी त्यांनी ५२ मतांनी विजय मिळविला आहे. संतोष देशमुख यांच्या हत्येनंतर ही निवडणूक होत असल्याने भावनिकतेची किनार होती. अनेक गावकऱ्यांच्या आग्रहानंतर अश्विनी देशमुखांनी उमेदवारी अर्ज दाखल केला होता. मात्र, त्यांना पराभवाला सामोरे जावे लागले आहे.
