आयोगाकडून विजय रॅलींवर बंदी; ‘या’ तारखेनंतर करता येईल विजयोत्सव…
पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीत भाजपची वाटचाल ऐतिहासिक यशाच्या दिशेने सुरू आहे. भाजपचा विजय जवळपास निश्चित होताना दिसतोय. भाजप 193 तर तृणमूल 94 जागांवर आघाडीवर आहे.
या पार्श्वभूमीवर निवडणूक आयोगाने महत्त्वाचा निर्णय घेत निकाल जाहीर झाल्यानंतर सर्व प्रकारच्या विजय रॅलींवर बंदी घातलीय.दोन टप्प्यांमध्ये पार पडलेल्या या निवडणुकीनंतर राज्यभरातील मतमोजणी केंद्रांच्या बाहेर कार्यकर्त्यांची प्रचंड गर्दी आहे.
मात्र निकालानंतरही कोणत्याही पक्षाला किंवा उमेदवाराला विजय साजरा करण्यासाठी रॅली काढण्याची परवानगी दिली जाणार नाही, असं मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांच्या कार्यालयाकडून स्पष्ट करण्यात आले आहे.कोलकाता पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, जर कोणाला विजय मिरवणूक काढायची असेल तर ती 5 मे 2026 नंतरच काढता येईल.
यासाठी संबंधित पोलीस ठाण्याच्या अधिकाऱ्यांची पूर्व परवानगी घेणे अनिवार्य असेल. परवानगी मिळालेल्या मिरवणुकांना सर्व नियम व अटींचे काटेकोर पालन करावे लागेल.
अतिरिक्त मुख्य निवडणूक अधिकारी अरिंदाम नियोगी यांनी हा निर्णय पूर्णपणे खबरदारीचा उपाय असल्याचं सांगितलं. मतमोजणीनंतर किंवा निकालानंतर कोणतीही अनुचित घटना घडू नये यासाठी हा निर्णय घेण्यात आल्याचा सांगण्यात आलंय.
294 जागांसाठी सुरू असलेल्या मतमोजणीत भारतीय जनता पक्ष आघाडीवर आहे. तृणमूल काँग्रेसच्या मतांच्या टक्केवारीत 48.02 वरून 41.52 टक्क्यांपर्यंतची घट आहे.2021 च्या तुलनेत भाजपच्या मतांची टक्केवारी 38.15 टक्क्यांवरून 44.77 टक्क्यांवर गेलीय .
