नवनीत राणांची टीका; विजयाची रणनीती सांगितली !
देशातील 5 राज्यांच्या निवडणुकांचे निकाल हाती आले असून तीन राज्यात भाजप (BJP) आघाडीवर आहे. त्यात, अवघ्या देशाचं लक्ष लागलेल्या पश्चिम बंगालमध्येही भाजपने जोरदार मुसंडी मारली असून तब्बल 200 जागांच्या जवळपास आघाडी घेतल्याचं चित्र आहे.
त्यामुळे, गेल्या 15 वर्षांपासून पश्चिम बंगालमध्ये असलेली तृणमूल काँग्रेसची सत्ता उलथवून टाकण्यात भाजपला यश आलंय. भाजपच्या या यशाबद्दल देशपातळीवर सेलिब्रेशन केलं जात असून मुंबई भाजप प्रदेश कार्यालयातही महिला कार्यकर्त्यांकडून आनंदोत्सवर साजरा होत आहे. भाजपच्या या विजयानंतर भाजपच्या महिला नेत्या आणि माजी खासदार नवनीत राणा यांनी ममता बॅनर्जींवर टीका केली. जो सनातनला आणि भगव्याला विरोध करेल, त्याच्यासोबत एकही राज्य उभा राहणार नाही, आज ममता बॅनर्जींचा अहंकार तुटल्याचं राणा यांनी म्हटलंय.
पश्चिम बंगाल हे आपल्या देशाचं राज्य आहे, जे आपल्याकडेच राहिले पाहिजे. पश्चिम बंगालमधील लोकांनी आज ते करुन दाखवलंय. पश्चिम बंगालमध्ये देशाच्या जनतेला जो निकाल अपेक्षित होता, तो आज आलेला आहे. इतक्या वर्षानंतर ममता बॅनर्जीचा खेल खतम झालेला आहे. देशाचे गृहमंत्री अमित शाह यांनी एक रणनीती बनवली होती, त्या रणनीतीचा हा विजय आपण सर्वजण पाहतोय, असे म्हणत नवनीत राणा यांनी ममता बॅनर्जींच्या पराभवावर भाष्य करत भाजपच्या महिला नेत्या आणि माजी खासदार नवनीत राणा यांनी ममता बॅनर्जींवर टीका केली.
ममता बॅनर्जींचा खेला खतम होबे
पश्चिम बंगालमध्ये जे ज्येष्ठ नेते होऊन गेले, त्यांनाही आज आनंद होत असेल. कारण, आज ममता बॅनर्जींचा अहंकार तुटला, अत्याचार करणाऱ्याला ममता बॅनर्जी सपोर्ट करत होत्या, असे म्हणत भाजप नेत्या नवनीत राणा यांनी पश्चिम बंगालमधील निकालानंतर आपली भूमिका मांडताना ममता बॅनर्जी यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला. जो सनातनला आणि भगव्याला विरोध करेल, त्याच्यासोबत एकही राज्य उभा राहणार नाही. ममता बॅनर्जी का खेला अब खतम हो गया है, आता खेला होबे नही, खेला खतम हो गया असे म्हणत नवनीत राणांनी ममता बॅनर्जी यांच्या पराभवावर भाष्य करत टीका केलीय.
रसगुल्ल्याचे डबे घेऊन आनंद साजरा
पश्चिम बंगालसह 3 राज्यातील विधानसभा निवडणुकांमधील विजयानंतर भाजप नगरसेवकांनी मुंबई महापालिकेतील पक्ष कार्यालयात जल्लोष सुरू केल्याचं दिसून आलं. जय श्री राम बोलेगा.. गाण्यावर भाजपच्या सर्व नगरसेवकांनी ठेका धरला आणि केला जयघोष केला. हेतल गाला, प्रीती साटम, शीतल गंभीर यांच्याकडून नाचत आणि फुगडी घालत आनंद साजरा करण्यात आला. तसेच, हातात रसगुल्लाचे डब्बे घेऊन नगरसेवक नाचताना दिसून आले. दुसरीकडे भाजप पक्ष कार्यालयात नगरसेविका तेजस्वी घोसाळकर यांच्याकडूनही महिला नगरसेविकांसोबत आनंद साजरा केला गेला.
