ठाणे प्रतिनिधी (नागेश पवार) ठाणे : पावसाळा तोंडावर आलेला असताना ठाणे महानगरपालिकेच्या नालेसफाईच्या दाव्यांमधील फोलपणा उघड करण्यासाठी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे नेते महेश कदम यांनी आज आक्रमक आणि आगळेवेगळे आंदोलन केले. ठाणे शहरातील नालेसफाई केवळ कागदावरच असल्याचा आरोप करत, कदम यांनी चक्क कचऱ्याने भरलेल्या नाल्यात बसून प्रशासनाचा निषेध केला.
ठाणे शहरात नालेसफाईची कामे वेगाने सुरू असल्याचा दावा प्रशासनाकडून केला जात आहे. मात्र, प्रत्यक्ष परिस्थिती काही वेगळीच असल्याचे सांगत महेश कदम यांनी आज थेट नाला गाठला. नुसतेच नाल्याकाठी न थांबता, ते एका लाकडी फळीच्या सहाय्याने नाल्याच्या मध्यभागी जाऊन बसले. “जोपर्यंत जबाबदार अधिकारी घटनास्थळी येत नाहीत आणि कामाचा जाब देत नाहीत, तोपर्यंत मी इथून उठणार नाही,” असा पवित्रा त्यांनी घेतला. जवळपास तासभरापासून हे आंदोलन सुरू असून परिसरात बघ्यांची मोठी गर्दी जमली आहे.
यावेळी बोलताना महेश कदम यांनी प्रशासनावर गंभीर आरोप केले. ते म्हणाले की: “ठाणे महापालिका नालेसफाईवर करोडो रुपये खर्च करते, पण प्रत्यक्षात शहरात १% देखील नालेसफाई झालेली नाही. ही नालेसफाई नसून केवळ पैशांची ‘हातसफाई’ सुरू आहे. पहिल्याच पावसात ठाणे तुंबण्याची भीती असून, अधिकारी एसी केबिनमध्ये बसून खोटे अहवाल सादर करत आहेत.”
हे आंदोलन सध्या सोशल मीडियावर आणि राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय ठरत आहे. आता पालिका प्रशासन यावर काय उत्तर देते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
