जगभरातील हवामान तज्ज्ञांनी यंदाच्या वर्षाच्या उत्तरार्धात ‘सुपर एल निनो’ येण्याची शक्यता व्यक्त केली आहे. हा एल निनो अत्यंत तीव्र असू शकतो आणि त्याचा परिणाम जगातील अनेक देशांसह भारतावरही होण्याची भीती व्यक्त केली जात आहे.
यामुळे पावसाचे प्रमाण, तापमान, चक्रीवादळे आणि शेतीवर मोठा परिणाम होऊ शकतो. जगातील तिसरी मोठी संस्था युरोपियन सेंटर फॉर मीडियम रेंज वेदर फोरकास्टिंगने नव्याने जाहीर अंदाजानुसार यंदा एल निनोचा प्रभाव सर्वाधिक असणार आहे. त्यामुळे जगभरात चिंतेचे वातावरण निर्माण झालं आहे.
एल निनो म्हणजे नेमकं काय?
एल निनो ही एक हवामानाशी संबंधित नैसर्गिक प्रक्रिया आहे. यात पॅसिफिक महासागरातील पाण्याचे तापमान सामान्यपेक्षा जास्त वाढते. याचा परिणाम जगभरातील हवामानावर होतो. साधारणपणे दर ३ ते ४ वर्षांनी एल निनोची परिस्थिती निर्माण होते. मात्र, यंदा तयार होणारा एल निनो हा सामान्य नसून ‘सुपर एल निनो’ असू शकतो, अशी शक्यता वर्तवली जात आहे.
‘सुपर एल निनो’ म्हणजे काय?
जेव्हा समुद्राच्या पाण्याचे तापमान सरासरीपेक्षा २ अंश सेल्सिअस किंवा त्याहून अधिक वाढते, तेव्हा त्याला ‘सुपर एल निनो’ म्हटले जाते. १९५० नंतर आतापर्यंत फक्त पाच वेळाच सुपर एल निनोची नोंद झाली आहे. २०१५-१६ मधील सुपर एल निनोमुळे जगभरात तीव्र उष्णता आणि हवामान बदलाचे परिणाम दिसून आले होते.
यंदाचा एल निनो अधिक धोकादायक ठरू शकतो
हवामान अंदाज मॉडेल्सनुसार, यंदाचा एल निनो शरद ऋतूपर्यंत खूप तीव्र होऊ शकतो. काही अंदाजांनुसार समुद्राच्या पाण्याचे तापमान सरासरीपेक्षा २.५ अंशांपर्यंत वाढू शकते. तज्ज्ञांच्या मते, हा १८७० नंतरच्या सर्वात मोठ्या एल निनो घटनांपैकी एक ठरू शकतो.
भारतावर काय परिणाम होऊ शकतो?
पावसावर परिणाम
एल निनोचा सर्वात मोठा परिणाम भारताच्या मान्सूनवर होतो. यामुळे देशात सरासरीपेक्षा कमी पाऊस पडण्याची शक्यता असते. काही भागांमध्ये दुष्काळसदृश परिस्थिती निर्माण होऊ शकते.
तापमानात मोठी वाढ
उन्हाळा अधिक तीव्र होऊ शकतो. उत्तर आणि मध्य भारतात उष्णतेच्या लाटा वाढण्याची शक्यता आहे. अनेक शहरांमध्ये तापमान विक्रमी पातळीवर जाऊ शकते.
शेतीवर मोठा परिणाम
पाऊस कमी झाल्यास खरीप पिकांना फटका बसू शकतो. विशेषतः सोयाबीन, कापूस, तूर, भात आणि ऊस पिकांवर परिणाम होण्याची भीती आहे. यामुळे अन्नधान्य उत्पादन कमी होऊन महागाई वाढू शकते.
पाणीटंचाईचा धोका
धरणांमधील पाणीसाठा कमी होण्याची शक्यता आहे. त्यामुळे अनेक राज्यांमध्ये पाणीटंचाई वाढू शकते.
चक्रीवादळांची शक्यता
हवामान तज्ज्ञांच्या मते, एल निनोचा परिणाम चक्रीवादळांच्या स्वरूपावरही होऊ शकतो. काही भागांमध्ये समुद्रातील हवामान अधिक अस्थिर होऊन तीव्र वादळे निर्माण होण्याची शक्यता आहे.
