मिडल इस्टमध्ये शांततेचे प्रयत्न सुरू असतानाच शुक्रवारी पहाटे एक मोठी लष्करी घडामोडी समोर आली आहे. इराणने संयुक्त अरब अमिरातीव एकापाठोपाठ एक अनेक ड्रोन आणि मिसाईल्स डागल्याने संपूर्ण प्रदेशात खळबळ माजली आहे.
या हल्ल्यामुळे अमेरिका आणि इराण यांच्यात गेल्या काही दिवसांपासून असलेला युद्धविराम संपुष्टात येऊन पुन्हा युद्ध सुरू होणार का याची जास्त धास्ती निर्माण झाली आहे.
UAE ची एअर डिफेन्स सतर्क; इराणचा प्रयत्न फसला
यूएईच्या संरक्षण मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, इराणच्या बाजूने येणारी क्षेपणास्त्रे आणि ड्रोन्स त्यांच्या प्रगत ‘एअर डिफेन्स सिस्टम’ने हवेतच नष्ट केली आहेत. सुदैवाने, या हल्ल्यात कोणतीही जीवितहानी झाल्याचे वृत्त नाही. मात्र, इंटरसेप्शनमुळे पडणाऱ्या मलब्यापासून नागरिकांनी सावध राहावे आणि अशा तुकड्यांच्या जवळ जाऊ नये, असा इशारा प्रशासनाने दिला आहे. सध्या अमिरातीचे लष्कर हाय-अलर्टवर आहे.
होर्मुजच्या समुद्रात अमेरिकन युद्धनौकांवर हल्ला
UAE वरील हल्ल्याच्या काही तास आधी, होर्मुजच्या भागात इराणने अमेरिकन नौदलाला लक्ष्य करण्याचा प्रयत्न केला. अमेरिकन सेंट्रल कमांडने दिलेल्या माहितीनुसार, इराणने कोणत्याही उकसाव्याशिवाय तीन अमेरिकन युद्धनौकांवर हल्ला केला. प्रत्युत्तर म्हणून अमेरिकेने इराणच्या त्या तळांना उद्ध्वस्त केले आहे, जिथून हे हल्ले करण्यात आले होते.
राष्ट्राध्यक्ष ट्रम्प काय म्हणाले?
८ एप्रिलपासून अमेरिका आणि इराणमध्ये तात्पुरता युद्धविराम सुरू होता. मात्र, या ताज्या हिंसेमुळे ‘सीजफायर’वर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. या घटनेवर भाष्य करताना अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी सांगितले की, “हिंसेच्या घटना घडल्या असल्या तरी, सध्या युद्धविराम कायम आहे.” अमेरिकेला सध्या तणाव वाढवायचा नसल्याचे संकेत ट्रम्प यांनी दिले आहेत.
का वाढलाय तणाव?
होर्मुजच्या खाडीतून होणारी जहाजांची वाहतूक विस्कळीत झाल्यामुळे जागतिक स्तरावर इंधन दरवाढीचे संकट ओढवू शकते. गेल्या महिन्यात पाकिस्तानच्या मध्यस्थीने दोन्ही देशांत चर्चा झाली होती, पण ठोस तोडगा निघू शकला नाही. UAE आता या हल्ल्याचा बदला घेण्यासाठी काय पाऊल उचलते, याकडे संपूर्ण जगाचे लक्ष लागले आहे. या सगळ्यामुळे पुन्हा महागाई वाढण्याचा धोका आहे.
