शिवसेना आणि काँग्रेसची गट्टी; तटकरेंना बालेकिल्यातच दणका…
म्हसळा नगर पंचायतीत एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे मंत्री भरत गोगावले यांनी राष्ट्रवादीला शह दिला तिथेच राष्ट्रवादीने पक्षांतर करणाऱ्या संबंधित नगरसेवकांवर कारवाई करत शिवसेनेचा टांगा पलटी केला.
यामुळे येथे आज गुरुवारी (ता. ७) होणाऱ्या नगराध्यक्ष पदाच्या निवडीकडे जिल्ह्यासह राज्याचे लक्ष लागले होते. ज्यात पुन्हा एकदा शिवसेनेनं काँग्रेसच्या मदतीने बाजी मारली आहे. पुन्हा एकदा गोगावले यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेने येथे सत्ता प्रस्थापित केली असून म्हसळा नगर पंचायतीवर अखेर भगवा फडकला आहे. तर येथे सत्ता येताच शिवसेनेच्या नगराध्यक्ष आणि नगरसेवकांनी नगराध्यक्षांच्या केबिनमधील खासदार सुनील तटकरे यांचा फोटो हटवला. यामुळे मंत्री अदिती तटकरे यांच्यासह खासदार सुनील तटकरे यांना मोठा धक्का बसला आहे.
म्हसळा नगर पंचायतीच्या नगराध्यक्ष पदाची निवडणूक गुरुवारी (ता. ७) दुपारी १२ वाजता विशेष सभेत पार पडली. यावेळी संपूर्ण तालुक्यासह जिल्ह्याचे लक्ष लागले होते. दुपारी १२ वाजल्यानंतर उमेदवारांची अंतिम यादी जाहीर करत लगेच मतदान प्रक्रिया पार पडली आणि तत्काळ निकाल देखील घोषित करण्यात आला. ज्यात १७ पैकी ९ जागांवर शिवसेनेला बहूमत मिळाले.
तर राष्ट्रवादीची पीछेहाट झाली. नगराध्यक्षपदासाठी शिवसेनेकडून शाहिद जंजिरकर तर राष्ट्रवादी काँग्रेसकडून सुनील शेडगे हे रिंगणात होते. राष्ट्रवादी काँग्रेसने आपल्या नगरसेवकांना सुनील शेडगे यांच्या बाजूने मतदान करण्यासाठी व्हीप जारी केला होता. तसेच २ दोन दिवसांपूर्वी खासदार सुनील तटकरे यांनी पत्रकार परिषदेत बंडखोर नगरसेवकांनी पक्षाचा व्हीप मोडल्यास कठोर कारवाईचा इशारा दिला होता.
गेल्या दहा वर्षांपासून म्हसळा नगर पंचायतीवर राष्ट्रवादीची सत्ता होती. पण चार महिन्यांपूर्वी नगराध्यक्षासह सहा नगरसेवकांनी पक्षांतर करत शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश केला. गोगावले यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेने येथे सत्ता प्रस्थापित केली. तटकरेंच्या सत्तेला सुरूंग लावण्याचे काम गोगावलेंनी केले होते. मात्र या पक्षांतरामुळे राष्ट्रवादी काँग्रेसने संबंधित नगरसेवकांवर कारवाई करत त्यांची सदस्यता रद्द केली होती. यामुळे शिवसेनेसह गोगावलेंना तटकरेंनी जोरदार धक्का दिल्याचे बोलले जात होते.
नगराध्यक्ष पदाच्या निवडणुकीत सत्तांतरानंतर शिवसेनेच्या नगराध्यक्ष आणि नगरसेवकांनी नगराध्यक्षांच्या केबिनमधील खासदार सुनिल तटकरे यांचा फोटो हटवला. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे आणि माजी मुख्यमंत्री बॅरिस्टर ए आर अंतुले यांचे फोटो लावले. तर आता या विजयाने राष्ट्रवादीला गोगावले यांच्याकडून धोबीपछाड मिळाला असून निकालानंतर शिवसेना आणि काँग्रेस कार्यकर्त्यांनी मोठा जल्लोष केला आहे.
दरम्यान एकीकडे जिल्ह्यात राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेमधील विकोपाला गेलेला सत्तासंघर्ष थांबला असून, आजच्या निकालाने राजकीय संघर्ष वाढण्याची शक्यता आहे. तसेच नगर पंचायतीतील आजचा निकाल आगामी राजकारणासाठी निर्णायक ठरणारा असून शिवसेना काँग्रेस अशी युतीचा नवीन समीकरणे तयार झाली आहेत. सध्याच्या शिवसेनेकडे १० नगरसेवकांचे संख्याबळ असून राष्ट्रवादी काँग्रेसकडे सहा नगरसेवक आहेत.
