भारतीय विनाशकारी शस्त्रास्त्रांचा आर्मेनियात धुमाकूळ; रशियाची मक्तेदारी संपली?
जागतिक राजकारणाच्या बुद्धिबळावर सध्या अतिशय वेगाने हालचाली सुरू आहेत. एकेकाळी रशियाचा ‘उपग्रह’ मानला जाणारा आर्मेनिया आता रशियाच्या ( Russia) प्रभावातून बाहेर पडला असून त्याने भारतासोबत आपले भविष्य जोडले आहे.
दक्षिण कॉकेशस प्रांतात सुरू असलेल्या या भू-राजकीय बदलाने संपूर्ण जगाचे लक्ष वेधून घेतले आहे. आर्मेनियाने रशियाकडून होणारी ९०% शस्त्र आयात आता १० टक्क्यांहून खाली आणली असून, भारताला आपला सर्वात मोठा शस्त्र पुरवठादार देश बनवले आहे. हा बदल केवळ व्यापारापुरता मर्यादित नसून तो पुतिन प्रशासनासाठी एक मोठा राजनैतिक पराभव मानला जात आहे.
युक्रेन युद्धाचा परिणाम आणि बदललेली समीकरणे
युक्रेनसोबतच्या प्रदीर्घ युद्धात रशिया अडकल्यामुळे त्याचा प्रभाव आपल्या जुन्या मित्रराष्ट्रांवरून कमी झाला आहे. आर्मेनिया आणि अझरबैजान यांच्यातील संघर्षात रशियाने अपेक्षित मदत न केल्यामुळे आर्मेनियाचा रशियन शस्त्रांवरील विश्वास उडाला आहे. गेल्या काही वर्षांत झालेल्या दोन युद्धांमध्ये आर्मेनियाने मोठी हानी सोसली. परिणामी, आर्मेनियाने पश्चिमेकडील देश आणि भारताकडे मदतीचा हात मागितला आहे. फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन आणि भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या संधीचा फायदा घेत आर्मेनियाला लष्करी आणि राजनैतिक पाठबळ दिले आहे.
भारतीय शस्त्रास्त्रांचा आर्मेनियात धुमाकूळ
आर्मेनिया आता भारताचा सर्वात मोठा शस्त्र आयातदार देश बनला आहे. २०२२ पासून आर्मेनियाने भारताकडून सुमारे २ अब्ज डॉलर्स म्हणजेच १६,००० कोटी रुपयांहून अधिक किमतीची शस्त्रे खरेदी केली आहेत.
यामध्ये खालील प्रमुख प्रणालींचा समावेश आहे:
१. पिनाका मल्टी-बॅरल रॉकेट लाँचर: अझरबैजानच्या ड्रोन हल्ल्यांना प्रत्युत्तर देण्यासाठी हे अत्यंत प्रभावी ठरत आहे.
२. आकाश-१एस क्षेपणास्त्र प्रणाली: हवाई संरक्षणासाठी भारताची ही स्वदेशी प्रणाली आता आर्मेनियाच्या सीमांचे रक्षण करत आहे.
३. प्रलय बॅलिस्टिक क्षेपणास्त्र: वृत्तानुसार, भारताने आपले घातक ‘प्रलय’ क्षेपणास्त्रही आर्मेनियाला दिले आहे, ज्यामुळे त्यांच्या आक्रमक क्षमतेत मोठी वाढ झाली आहे.
४. एटीएजीएस आणि मारग तोफा: भारतीय बनावटीच्या या तोफा आता आर्मेनियाच्या तोफखान्याचा कणा बनल्या आहेत.
याशिवाय, आर्मेनिया आपल्या सुखोई (Su-30) विमानांना भारतीय मानकांनुसार अपडेट करण्यासाठी आणि नवीन विमाने खरेदी करण्यासाठी सुमारे ३ अब्ज डॉलर्सच्या महाकरारावर चर्चा करत आहे.
युरोपियन युनियनकडे आर्मेनियाची वाटचाल
आर्मेनियाने नुकतेच येरेवानमध्ये युरोपियन राजकीय समुदाय शिखर परिषदेचे आयोजन केले होते. फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष मॅक्रॉन यांनी आर्मेनियाला रशियाचे ५,००० सैनिक मायदेशी धाडण्याचा सल्ला दिला आहे. आर्मेनिया आता स्वतःला युरोपियन युनियनच्या (EU) जवळ नेत असून रशियाचे युग संपल्याचे संकेत दिले आहेत. भारताने केवळ शस्त्रेच दिली नाहीत, तर आंतरराष्ट्रीय उत्तर-दक्षिण वाहतूक कॉरिडॉरच्या माध्यमातून आर्मेनियाला जागतिक बाजारपेठेशी जोडण्याचे आश्वासनही दिले आहे.
